या गावात सर्व गावकरी बुद्धिबळ खेळतात ! जणून घ्या यामागचे कारण
आजपर्यंत आपल्या भारत देशाने जगाला शून्य, आयुर्वेद, योगा अशा अनेक उपयोगी गोष्टी दिल्या आहेत. यासोबतच भारताने जगाला बुद्धिबळ या खेळाची ओळख देखील करून दिली. साधारण इसवी सन सहाव्या शतकात भारतात हा खेळ चतुरंग या नावाने खेळायला जायचा अशी नोंद आहे आणि आज हाच खेळ रशिया, अमेरिका, भारत यांसारख्या अनेक देशांमध्ये फार लोकप्रिय झाला आहे आणि मागील काही काळात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी भारतीय बुद्धिबळाला एक नवसंजीवनी दिली आहे.
अशा या आपल्या भारत देशात विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली शहरे व गावे आपल्याला माहितच आहेत पण आज आपण अशा एका गावाची माहिती घेणार आहोत जेथे सर्वांनाच बुद्धिबळ खेळायला फार आवडते. आणि बुद्धिबळाने कशी गावातली परिस्थिती पालटली हे बघणार आहोत.
केरळ राज्याच्या उत्तर भागात वसलेले मरोतीचल हे एक छोटेसे बुद्धिबळ खेळणारे गाव आहे. परंतु या गावाला बुद्धिबळाची गोडी कशी लागली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळपास पन्नास वर्षे मागे जावे लागेल. 1960 व 70 च्या दशकात गावातील परिस्थिती ही फारच चिंताजनक होती कारण गावातील जवळपास अनेक पुरुष मंडळी ही दारू व सत्याच्या आहारी जाऊन आपली सर्व धनदौलत व संपत्ती गमावून बसली होती यामुळेच गावात स्त्रियांवरील अत्याचार व चोऱ्या होण्याचे प्रमाण हे देखील वाढले होते. गावातील वरिष्ठ मंडळींनी या संकटातून गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु काही केल्या त्यांना यश येईना.
यादरम्यानच गावातील एक चहा विक्रेते सी उन्नीकृष्णन यांच्यात बुद्धिबळाची आवड निर्माण झाली,आणि सहजच त्यांनी गावातील इतर गावकऱ्यांना देखील बुद्धिबळ कसे खेळायचे हे शिकवले. काही दिवसांनी संपूर्ण मरीतोचल गावाला बुद्धिबळाचे वेड लागले आणि सर्वच गावकरी विरंगुळ्यासाठी बुद्धिबळ खेळू लागले. यादरम्यानच गावातील दारू व सट्टा यांसारख्या वाईट सवयीचे प्रमाण देखील फार कमी झाले.उन्नीकृष्णन यांच्या एका छोट्याश्या प्रयत्नामुळे संपूर्ण गावाने दारू व सट्टा यांना चेकमेट केले.
आज गावातील सर्वच घरातील निदान एक व्यक्ती तरी नित्यनियमाने बुद्धिबळ खेळते तसेच एकाच वेळी 1000 लोक एकत्र बुद्धिबळ खेळण्याचा आशियाई विक्रम हा देखील मरीतोचल गावाच्या नावावर आहे.मरीतोचल सारख्या छोट्या गावाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्यालाही पुन्हा आपल्या बुद्धिबळाच्या खेळाला नवसंजीवनी देण्याची वेळ आली आहे त्यामुळे आपण सर्वांनी या महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व बुद्धिबळ ओलंपियाड स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देऊया.
लेखक – सोहम लाडगांवकर