महिला सन्मान बचत योजना 2023 सोप्या सरळ भाषेत | Mahila Samman Saving Certificate
- योजनेची माहिती
- योजनेची पात्रता आणि अटी
- योजनेच्या ठेवींचे नियम
- योजनेचा व्याजदर
- योजनेतील पैसे काढण्याचे नियम
- योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- योजनेत गुंतवणूक कशी करायची?
- महिला सन्मान बचत आणि सुकन्या समृद्धी योजना फरक
नमस्कार मित्रांनो, आज आपण भारत सरकारच्या एका नवीन इन्व्हेस्टमेंट स्कीम “महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ” म्हणजेच महिला सन्मान बचत पत्र या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत, फायदे काय आहेत, ही योजना कोणासाठी आहे, त्यासाठी पात्रता व कोणती कागदपत्रे लागणार आहेत, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या देशातील महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व कल्याणासाठी वेळोवेळी भारत सरकारने काही विशिष्ट योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक बचत योजना ज्याचे नाव, ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (Mahila Samman Saving Certificate) असे आहे. मित्रांनो, आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 साल चे अर्थ संकल्प सादर करताना या योजने बद्दल जाहीर केले होते. व महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
मित्रांनो, ही योजना फक्त महिलांसाठी आहे. आणि योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील निम्मी लोकसंख्या नक्कीच स्वावलंबी बनेल अशी अपेक्षा आहे. पण मित्रांनो,या योजने बद्दल लोकांच्या मनात मध्ये खूप काही प्रश्न आहेत, अनेकांना तर या योजने बद्दल अजून ही काही माहिती नाही. पण तुम्ही काळजी करू नका. कारण या योजने बद्दल आज आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहोत. की ही महिला बचत पत्र योजना म्हणजे नेमक काय आहे?, या योजने अंतर्गत काय फायदे मिळणार, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार अशी संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत. त्यामुळे आमचा आज चा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात पहिले महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना म्हणजे नेमकं काय आहे, या बद्दल माहिती जाणून घेऊ या
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना माहिती
मित्रांनो, 1 एप्रिल 2023 पासून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना फक्त महिलांसाठी सुरू झाली आहे. आणि त्या बद्दल सरकारने सर्व तपशील दिले आहेत. ही योजना पोस्ट ऑफिस आणि काही बँकांमध्ये देखील उपलब्ध असेल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक प्रकारची छोटी बचत योजना आहे. तसेच ही योजना एप्रिल 2023 ते मार्च 2025 या दोन वर्षांच्या कालावधी साठी उपलब्ध आहे आणि या योजनेत महिला आणि मुलींना 7.5% प्रति वर्ष इतके व्याजदर मिळणार असून या योजनेत दोन लाख रुपयां पर्यंत गुंतवणूक करता येईल. मित्रांनो, ही योजना महिला गुंतवणूकदारांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी व स्वावलंबी बनवण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.
खरंतर, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना हा सरकारने महिलांसाठी उचललेला एक खूप चांगला उपक्रम आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्या सारखी आहे की या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा केवळ 2 लाख रुपयां पर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना उच्च उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. तसेच दुसरीकडे, ही योजना कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना अल्पावधीतच मजबूत परतावा देऊ शकते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र | तपशील |
---|---|
व्याज दर | 7.50% |
किमान गुंतवणूक रक्कम | 1000/- रु. |
जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम | 2.00,000/- रु. |
गुंतवणुकीचा कालावधी | 2 वर्ष |
आंशिक पैसे काढण्याचा नियम | जमा रकमेच्या 40% |
महिला सन्मान बचत योजनेची पात्रता
मित्रांनो, सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे या योजनेत फक्त महिला किंवा मुलगी अर्ज करू शकते. यात वयाची कोणतीही अट नाही. तसेच या योजनेत फक्त एका व्यक्ती साठीच खाते उघडले जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही या योजनेत संयुक्त खाते उघडु शकत नाही. या योजनेत मुलगी किंवा महिला स्वतःच खाते उघडू शकेल. आणि जर मुलगी लहान किंवा अल्पवयीन असले तर मुलीचे खाते उघडण्यासाठी एक कायदेशीर पालकाची गरज लागते.
महिला सन्मान बचत योजनेची मुदत किती आहे?
मित्रांनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची मुदत ही दोन वर्षांची आहे. म्हणजेच 31 मार्च 2025 ही योजना उपलब्ध असेल.
महिला सन्मान बचत योजनेच्या ठेवींचे नियम
मित्रांनो, महिला सन्मान बचत योजने अंतर्गत सरकारने ठेवींवर काही नियम आखून दिले आहेत. जसे की
- खाते धारकाला त्याच्या खात्यात किमान 1000 रुपये व त्यापुढे शंभरच्या पटीत कितीही रक्कम ठेवता येईल.
- तसेच कमाल गुंतवणूकीची मर्यादा रू 2 लाख इतकी ठेवली आहे.
- या शिवाय या योजने संबंधित खातेदार म्हणजेच महिला किंवा मुलगी कितीही खाते उघडू शकतात.
- तसेच प्रत्येक नवीन खातं, जुने खाते उघडल्यावर तीन महिन्या नंतर उघडता येईल. मित्रांनो, या नियम आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
उदाहरण:
समजा, एखाद्या खाते धारकाने 10 एप्रिल 2023 ला या योजनेत रू 50000 भरून खाते उघडले. ती व्यक्ती अजून दीड लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते. पण सध्या त्या व्यक्तीकडे फक्त 50000 रू आहेत. मग अजून पैसे गुंतवण्यासाठी ती व्यक्ती 10 एप्रिल नंतर तीन महिन्यांनी म्हणजेच 10 जुलै 2023 रोजी 50000 रुपये गुंतवून नवीन खाते उघडू शकते. पण त्या आधी उघडू शकणार नाही.
मित्रांनो, आता समजा त्या व्यक्तीकडे अजून 1 लाख रुपये जमा झाले व ते पैसे योजनेत गुंतवायचे झाल्यास त्या व्यक्तीला 10 जुलै नंतर आणखी तीन महिन्यांनी म्हणजे 10 ऑक्टोबर 2023 रोजी हे 1 लाख रुपये गुंतवून नवीन खाते उघडता येईल.
मित्रांनो, आता वरती उदाहरणात दिलेल्या रकमा या फक्त योजना समजावून सांगण्यासाठी आहेत. आणि प्रत्येक नवीन खाते उघडण्यासाठी 3 महिन्यांची मुदत ही किमान मुदत आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर आधीचे खाते उघडून झाल्यावर तीन महिन्या नंतर कधीही तुम्ही नवीन खाते उघडू शकता.
महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर
मित्रांनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत खाते धारकाच्या ठेवींवर लागू होणारा व्याजदर हा 7.5% प्रति वर्ष इतका आहे. तसेच या व्याजाच्या प्रकारात तिमाही चक्रवाढ होते. परंतु जर खाते धारकाने या नियमांचे उल्लंघन केले तर गुंतवलेल्या ठेवीला बचत खात्याचे व्याजदर लागू होतील. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत दोन वर्षांच्या कालावधीसाठी रू 2 लाख पर्यंतच्या ठेवींवर 7.5% वार्षिक व्याज दर आहे.
पुढे दिलेल्या एका उदाहरणाने आपण ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ.
मित्रांनो, समजा तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत रू 2 लाख गुंतवले. तर पहिल्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला व्याजाची रक्कम ही रू 15,427 असेल. तर, पहिल्या वर्षी जमा झालेली रक्कम रू 2,15,427 इतकी होईल. आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटी, व्याजाची रक्कम ही रू 16,617 इतकी असेल. म्हणजेच याचा अर्थ मॅच्युरिटीच्या वेळी एकूण रक्कम रू 2,32,044 असेल. थोडक्यात या योजनेतून 2 वर्षानंतर तुम्हाला ₹ 2,00,000 (गुंतवणूक रक्कम) + 32,044 (मिळालेले व्याज) = रू 2,32,044 (एकूण रक्कम) इतकी रक्कम मिळेल.
महिला सन्मान बचत योजनेतील पैसे काढण्याचे नियम
मित्रांनो, या योजनेत खाते धारक खातं उघडून एक वर्ष झाल्यानंतर त्यावेळी जमा रकमेच्या 40 टक्के रक्कम काढू शकतो. पण यासाठी खाते धारकाला संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत संपण्या आधी फक्त एकदा काढता येते. तसेच जर तुम्ही अल्पवयीन मुलीच्या वतीने खाते उघडले असेल आणि जर तुम्हाला मुदत संपण्याआधीच पैश्यांची गरज असेल तर कायदेशीर पालक पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकता.
आता योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर काय केले जाते ते जाणून घेऊ या
मित्रांनो, या योजनेत खाते उघडून दोन वर्षे पूर्ण झाल्या वर खाते परिपक्व होते व ठेवीदाराला खात्यातील जमा झालेली रक्कम परत मिळते. त्यासाठी ही खाते धारकाला संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत अर्ज करावा लागेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत खाते मुदतीपूर्वी बंद करायचे झाल्यास काय नियम आहेत?
- मित्रांनो, जर खाते धारकाचा मृत्यू झाला असले तरच तुम्ही ते खाते मुदतीपूर्वी बंद करू शकता.
- याशिवाय जर खाते धारकाला गंभीर आजार झाला असल्यास त्यासाठी पैश्यांची गरज असेल तर ते खाते बंद करू शकता.
- तसेच जर अल्पवयीन मुलीच्या पालकांचा मृत्यू झाला असेल आणि खाते चालू ठेवणे शक्य नसेल तर अश्या परिस्थितीत ही खाते मुदतीपूर्वी बंद करता येते.
- मित्रांनो, वरील कोणत्याही कारणांमुळे खाते मुदतीपूर्वी बंद केल्यास खातेधारकला आधी ठरलेल्या व्याजदर म्हणजेच 7.5% व्याजदर मिळेल. पण जर या व्यतिरिक्त इतर काही कारणांनी खाते बंद करायचे झाल्यास खाते उघडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतरच खाते बंद करता येईल. आणि अश्या प्रकारे खाते बंद केल्यास मिळणारा व्याजदर हा ठरलेल्या व्याजदरापेक्षा दोन टक्क्यांनी कमी म्हणजेच 5.5% इतका मिळेल.
महिला सन्मान बचत योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
मित्रांनो, या योजनेत खाते उघडण्यासाठी व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक आहे. याशिवाय व्यक्तीची ओळख म्हणून व पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र वगैरे कागदपत्रे आवश्यक आहेत. तसच अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडणार असाल तर मुलीचा जन्माचा दाखला अनिवार्य आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक कशी करायची?
मित्रांनो, तुम्हाला जर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूक करायची असेल किंवा खाते उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा योजना ऑफर करणार्या बँकेत जायचे आहे. व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज भरून द्यायचा आहे. व त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करायची आहेत. त्या नंतर तुम्हाला ठेव रक्कम निवडायची आहे व ती रक्कम कश्या पद्धतीने तुम्ही जमा करणार आहेत म्हणजे रोख किंवा चेक ते सांगायचे आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पुरावा म्हणून एक प्रमाणपत्र दिले जाईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना फरक
विशेष | महिला सन्मान | सुकन्या |
---|---|---|
पात्रता | महिला आणि मुली | 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी फक्त मुलीच्या नावावर |
व्याज दर | 7.5% | 8.0% |
कालावधी | 2 years | 21 years from opening the account or when the girl child attains 18 years |
ठेव मर्यादा | किमान – 1,000 रु. कमाल – 2 लाख रु. | किमान – 250 रु. कमाल – 1.5 लाख रु. |
आंशिक पैसे काढण्याचा नियम | एका वर्षानंतर 40% पैसे काढण्याची परवानगी देते | विशिष्ट परिस्थितीत परवानगी आहे |
टॅक्स मध्ये लाभ | अद्याप स्पष्ट नाही | 80C श्रेणी अंतर्गत सूट (EEE) श्रेणी |
FAQ
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत किती व्याजदर दिले जाते?
मित्रांनो, महिला सन्मान बचत पत्र या योजनेत प्रति वर्ष 7.5% व्याजदर दिले जाते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री आहे का?
मित्रांनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेची कर रचना अद्याप सरकारने स्पष्ट केलेली नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत कोण गुंतवणूक करू शकते?
मित्रांनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक अल्पबचत योजना असून या योजनेत फक्त महिला आणि मुलीच गुंतवणूक करू शकतात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा कालावधी किती आहे?
मित्रांनो, या योजनेचा कालावधी फक्त दोन वर्षे म्हणजे एप्रिल 2023 ते मार्च 2025 पर्यंतचा आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजने मध्ये जास्तीत जास्त किती रुपये गुंतवणूक करू शकतो?
मित्रांनो, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त रू 2 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण महिला सन्मान बचत पत्र म्हणजेच Mahila Samman Savings Certificate बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या योजने द्वारे महिलांना आर्थिक दृष्ट्या नक्कीच स्वावलंबी बनता येईल. त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे, असे म्हणण्यास काही हरकत नाही. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।