ई-पीक पाहणी: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या | E Pik Pahani
2024 च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे.
यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबरपासून तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू होईल.
तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे? याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
ई-पीक पाहणी कशी करायची?
शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलं जातं. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे.
पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani (DCS) असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Install वर क्लिक करायचं आहे.
इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मग अँप वापरण्यासाठी आवश्यक त्या बाबींना परवानगी द्यायची आहे.
हे पेज उजवीकडे सरकवल्यास अँप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.
पुन्हा एकदा उजवीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.
त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे.
मग पुढे शेतकरी म्हणून लॉग-इन करा, या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे विभाग, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
आता पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.
इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.
मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा (OTP) नावाचं पेज ओपन होईल.
आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.
आता खातेदाराचं नाव निवडा. मोबाईलवर आलेला OTP टाका आणि पुढे जा.
आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.
पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की एकच पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.
एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे. मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
आता ज्या गटातल्या पिकांची नोंद करत आहात, त्या गटात उभं राहून पिकांचे दोन फोटो घेणे अनिवार्य आहे.
त्यासाठी छायाचित्र-1 पर्यायावर क्लिक करायचं आहे. पिकाच्या जवळ जाऊन फोटो घ्यायचा आहे. मग त्याचा अक्षांश, रेखांश तिथं येईल.
मग छायाचित्र-2 पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुन्हा पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या अँगलनं फोटो घ्यायचा आहे. त्याचेही अक्षांश, रेखांश तिथं येईल.
खाली असलेल्या बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही भरलेली माहिती वाचून घ्यायची आणि खालच्या घोषणेवर टिक करायचं. मग पुढे या पर्यायावर क्लिक करायचं.
पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
ही माहिती 48 तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करता येते.
अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.
या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.
दरम्यान, ई-पीक पाहणी करताना अॅप व्यवस्थित न चालणे, पिकांची नोंदणी करताना एरर येणे, पीक माहिती नोंदवली तरी ती न दिसणे अशा अडचणी येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
ई-पीक पाहणीचे फायदे काय?
ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते.
MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो.
पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.
पीक विमा योजनेच्या लाभासाठी – पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.
नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.
ई-पीक पाहणीची अट कशासाठी रद्द?
राज्य सरकारनं गेल्यावर्षीच्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आणि त्यात सोयाबीन-कापूस नोंद आहे त्यांनाच लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं.
सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.
त्यानंतर मग हे अनुदान देताना ई-पीक पाहणीची अट रद्द करून सात-बाऱ्यावरील नोंदी ग्राह्य धरल्या जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच केली.
त्यामुळे ई-पीक पाहणीची अट केवळ या अनुदानासाठी रद्द करण्यात आलीय. खरिप पिकांच्या नोंदीसाठी मात्र शेतकऱ्यांना पीक पाहणी करावीच लागणार आहे.
Tags: e pik pahani kashi karavi 2024, e peek pahani kashi karavi, e pik pahani kashi karavi 2024 problem, e peek pahani app problem, e peek pahani last date 2024, e peek pahani online maharashtra, pik pahani online maharashtra, pik pera form kasa bharava, pik pahani kashi bharavi 2024, pik pahani online, e peek pahani online apply