आगळं वेगळं

या माणसाने मुंबईला वाचवले

महामारीची झळ ही किती तीव्र असते याचा अनुभव आपण सर्वांनीच मागील दोन वर्षांत घेतला आहे. आज कित्येक जणांना अत्युच्च सोयीसुविधा उपलब्ध असून देखील या महामारीत आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण आपल्या पैकी किती जणांना माहीत आहे की अशाच एका महामारीने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी मुंबईत थैमान घातले होते.

Ya mansane Mumbai la vachavle

सप्टेंबर 1896 चा महिना होता.मुंबईत अधिकृतरीत्या प्लेगचा पहिला बळी नोंदवला गेला होता. सगळीकडेच नवीन गटारे बांधल्यामुळे हे होत आहे अशा अफवा जनमानसांत पसरत होत्या त्यामुळे सर्वच बाजूंनी ब्रिटिश सरकारवर ताशेरे ओढले जात होते. सर्वत्र दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण व मृत्यू यांमुळे त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट हे अगदी अत्यवस्थ झाले होते. गावच्या गावं ओसाड पडू लागली होती. लोक मुंबईसोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करू लागले होते.



त्यामुळे इंग्रज सरकारने या आणीबाणीच्या परिस्थितीत संसर्गजन्य रोग कायदा मंजूर केला. ज्याच्या अंमलाने मुंबईहून सुटणाऱ्या प्रत्येक रेल्वे गाडी व जहाजातील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सुरू झाली. तपासणीशिवाय कोणालाही मुंबई सोडता येणार नव्हती. हळूहळू मुंबईतील परिस्थिती ही हाताबाहेर जाऊ लागली होती. चक्क गव्हर्नरांनीच आपली स्वारी पुण्याला हलवली होती. त्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी हाफकिन यांना साकडे घातले. मुंबईतील परळला आपण जे ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ पाहतो त्यातील हेच ते डॉ. वाल्डेमेर हाफकिन.

हा हाफकिन मूळचा रशियन म्हणजेच आजच्या युक्रेनचा होता. तसेच धर्माने तो ज्यू होता. रशियातील ज्यूंच्या छळाला कंटाळून त्याने रशिया सोडला व तो जगप्रसिद्ध संशोधक लुई पाश्चरजवळ मदतनीस म्हणून पॅरिसमध्ये कामाला होता. पॅरिसमध्येच त्याने कॉलरा या रोगावरती लस शोधून काढली.पण त्याची चाचणी करण्यासाठी त्याला कॉलराचे रोगीच मिळत नव्हते. शेवटी नाईलाजास्तव कॉलराचे जंतू त्याने स्वतःच्या अंगात टोचून घेतले. व स्वतःच शोधलेल्या लशीने तो बराही झाला.

अशीच 1893 साली भारतातील कलकत्त्यात आलेल्या कॉलराच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हाफकिन व त्याच्या लशींनी महत्वाची भूमिका बजावली. नंतर लॉर्ड सँडहर्स्टच्या आग्रहाखातर 7 ऑक्टोबर 1896 रोजी डॉ. हाफकिन मुंबईत आला. मुंबईतील परिस्थिती ही आधीच हलाखीची होती. डॉ. हाफकिनला आजच्या जे. जे. हॉस्पिटल संकुलातील ग्रँट मेडिकल कॉलेजातील पेटीट प्रयोगशाळेतील एक दालन प्रयोगशाळा म्हणून देण्यात आले. प्लेगचे जंतू सुरुवातीला हाफकिनने दहा-पंधरा दिवस वाढू दिले. व नंतर क्लोरोफार्म देऊन त्यांना मृत केले. हे मेलेले जंतू हीच हाफकिनची प्लेगची लस होती.

आता याच लशीच्या चाचणीची वेळ आली. त्यामुळे हाफकिनने सुरुवातीला उंदरांची निवड केली. प्रथम त्याने वीस जिवंत निरोगी उंदीर घेतले व त्यातील दहा जणांना आपली लस टोचली व पिंजऱ्यात सोडले. त्यानंतर अजून एक प्लेग बाधित उंदीर त्याने पिंजऱ्यात सोडला ज्यामुळे पिंजऱ्यात एकूण 21 उंदीर झाले. काही दिवसांनी लस न टोचलेले दहा उंदीर हे प्लेगमुळे मृत पावले व हाफकिनच्या प्लेगवरील लशीला यश प्राप्त झाले. पुढे हाच प्रयोग त्याने सशांवर देखील केला.

यानंतर मानवी चाचणीची पाळी आली. कितीही अथक प्रयत्न करून देखील एकही माणूस पुढे आला नाही. शेवटी पुन्हा आपल्या लशीवर विश्वास दाखवून हाफकिनने ती लस प्रथम स्वतःलाच टोचून घेतली. त्याला काही झाले नाही हे पाहून अनेक जण लस घेण्यासाठी पूढे आले.



हळूहळू प्लेगेने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले व हाफकिन व त्याच्या लशींनी प्लेगच्या महामारीतून मुंबईची सुटका केली.

लेखक – सोहम लाडगांवकर

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!