आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

गृहिणींनो फक्त काही सवयी बदलून वाढलेले वजन कमी करा!

वाढलेले वजन हे अनेकांच्या उरात धडकी भरवते. बरेच प्रयत्न करुन, वेगवेगळे डाएट प्लॅन अजमावून ही वजन म्हणावे तसे कमी होत नाही. बऱ्याचदा गृहिणी ठरवून ही नियमीत व्यायाम करू शकत नाहीत. पर्यायाने वाढणाऱ्या वजनाचा प्रश्न जिथल्या तिथे राहतो.

Weight Loss Tips for Housewife

या लेखात आपण फक्त काही सवयी बदलून वजन कसे कमी करता येईल ते पाहूया.



1. रोजचेच जेवण पण तोलून मापून

बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी आपण अनेक पदार्थ जेवणातून वगळतो. जसे भात, बटाटे, गोड पदार्थ इत्यादि. पण आपल्या शरीराला प्रत्येक घटकाची गरज असते. जसे भात, बटाटे कर्बोदके देतात तर गोड पदार्थांमध्ये ग्लुकोज असते. बऱ्याचदा हे पदार्थ आपल्या आवडीचे असतात. मग मन मारुन राहण्यापेक्षा ते पदार्थ तुम्ही जरुर खा परंतु कमी प्रमाणात.
म्हणजे बघा आवडतं म्हणून मोठी वाटी भरुन हलवा खाण्यापेक्षा वाटीचा आकार कमी करा. त्यामुळे तुमचे मनही तृप्त होईल आणि पोटात जाणाऱ्या कॅलरीज कमी होतील.

2. समतोल साधा

एखाद्या दिवशी आपल्या आवडीची भाजी असते. अशावेळी चार घास जास्तच खाल्ले जातात. जर असे झाले तर समतोल साधण्यासाठी तुम्ही भात घेऊ नका. किंवा याच्या उलटही करू शकता. एखाद्या दुपारी जेवण थोडं जास्त झालं असेल तर रात्री फळांचा रस किंवा ग्लासभर दूध घेऊ शकता. काहीजणांना रात्री जेवल्याशिवाय झोप लागत नाही. अशा लोकांनी रात्री एखादी लहानशी पोळी, थोडासाच भात खावा. थोडक्यात काय तर आहाराच्या क्वांटिटीमध्ये समतोल साधा.

3. कठोर उपवास? अजिबात नाही

बऱ्याचदा काय होतं की वजन कमी करणे आपण खूपच मनावर घेतो. त्यासाठी कडकडीत उपवास, फक्त द्रव पदार्थ घेणे, मोड आलेली कडधान्ये खाणे असे फंडे आजमावयाला लागतो. आठवडा भरात खरोखर वजन कमी झाल्यासारखे ही वाटते. पण ते फसवे असू शकते. आणि झाले तर नुकसानच होते. कसे? त्याचे शास्त्रीय कारण खाली वाचा.

जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता तेव्हा शरीर त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रुपात साठवली जाते जी गरजेच्या वेळी शरिराकडून उपयोगात आणली जाते. या मार्गाने शरीराची ऊर्जेची गरज आणि एमर्जन्सीसाठीचा साठा भागवल्या जातात. पण जेव्हा तुम्ही नेहमी उपाशी राहता तेव्हा शरीराची ऊर्जेची गरज भागवली जात नाही. त्यातून शरीर एक शिकवण घेते की भविष्यात आपल्याला ऊर्जेची आवश्यकता लागू शकते. आणि भविष्याची सोय म्हणून ग्रहण केलेल्या जास्तीत जास्त अन्नाचे चरबीत रूपांतर करते. पर्यायाने चलनवलनासाठी लागणारी ऊर्जा कमी पडते आणि आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणजे शरीरावर चरबीचे थरच्या थर असूनही आपण निरोगी नसतो.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शरीराला समतोल आहाराची गरज असते. एखाद्या गोष्टीची कमतरता नंतर एखाद्या रोगावर जाऊ शकते. ॲसिडिटी, अनिमिया सारखे आजारही होवू शकतात. शिवाय अनेक दिवस कंट्रोल केल्याने एक दिवस जिभेवरील ताबा सुटतो आणि भरमसाठ खाल्ले जाऊन सगळं मुसळ केरात जाऊ शकते. म्हणूनच कडक उपवास करणे, एकदा जेवणे अशा गोष्टी करण्यापेक्षा वर दिलेला दुसरा मुद्दा अमलात आणणे श्रेयस्कर ठरेल.



4. फास्ट फूड

हल्ली आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा – दोनदा पिझ्झा, बर्गर, चायनीज पदार्थ खाणे नॉर्मल झाले आहे. असे पदार्थ शक्यतो वीकेंडला रात्रीच्या जेवणाला पर्याय म्हणून खाल्ले जातात. या पदार्थांत प्रचंड प्रमाणात कॅलरीज असतात हे सर्वांनाच माहीत असते. पण खाल्ल्याशिवाय राहवत नाही. रात्री हे पदार्थ खाल्ले तर शरीराची हालचाल नसल्याने त्यांतून मिळणाऱ्या कॅलरीज फॅटच्या रुपात शरीरावर साठत जातात. म्हणून हे पदार्थ रात्रीऐवजी दुपारच्या जेवणासाठी मागवले तर दिवसभर आरामात पचून जातात.

5. थोडासा व्यायाम

व्यायाम करण्याबद्दल गृहिणींचे असे म्हणणे असते की आम्ही घरातली इतकी कामं करतो की आपोआप आमचा व्यायाम होवून जातो. पण प्रत्यक्षात हा एक गोड गैरसमज आहे. जर तुम्ही रोज हाताने कपडे धुवत असाल, खाली बसून फडक्याने भल्या मोठ्या घरातली लादी पुसत असाल किंवा वाटण घाटन जुन्या पद्धतीनुसार पाट्यावर करत असाल तरच व्यायाम होतो असं म्हटलं जाईल. कारण या सगळयात शाररिक कष्ट होतात. पण आजच्या यंत्र युगात जास्तीत जास्त काम मशीन किंवा यंत्र वापरुन केली जातात त्यामुळे शाररिक कष्ट बरेच कमी झाले आहेत. त्यामुळे घरकामाने व्यायाम होतो हे तितकेसे बरोबर नाही.
पण जवळच्या अंतरासाठी पायी जाणे, लिफ्ट ऐवजी जिना वापरणे इतकंच काय फोनवर बोलत असताना घरातल्या घरात फेऱ्या मारणे हे छोटे छोटे उपाय केल्याने मोठा फरक पडतो.

6. हेल्थ ट्रॅकिंग ॲप्स

हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या मोबाइलच्या ॲप स्टोरमध्ये अनेक फ्री ॲप्स आहेत जे तुम्हाला फिट राहण्यासाठी मदत करतील. यातील एखादा ॲप डाऊनलोड करून घ्या. या ॲप्सचा उपयोग करुन तुम्ही तुमचा रोजचा कॅलरी इनटेक ट्रॅक करू शकता, रोजचा डायट प्लॅन करू शकता, आपल्या कॅलरीजच्या गरजेनुसार कोणते पदार्थ खायचे ते ठरवू शकता. वॉक करताना मोबाईल खिशात ठेवून किती कॅलरी बर्न झाले हे सुद्धा पाहू शकता. थोडक्यात हे ॲप्स खरोखरच अतिशय उपयुक्त ठरतात.

7. दुपारची झोप, स्ट्रेस, ताणतणाव वगैरे

भारतीय शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस झोपणे हे अयोग्य मानले जाते. पण थोडीशी वामकुक्षी घेणे,ज्याला हल्लीच्या भाषेत पॉवर नॅप म्हटले जाते, हितकारक समजले जाते. दुपारच्या वेळेस ३० ते ४५ मिनिटं झोपल्याने सकाळपासून थकलेल्या शरीराला थोडा आराम मिळतो. तसेच ताणतणाव दूर होतात. हे काही प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पण फक्त थोडी विश्रांती, दोन तीन तासांची सॉलिड झोप नाही.

8. संध्याकाळी लवकर जेवणे???

कित्येक आहारतज्ञ संध्याकाळचे जेवण सात ते आठ वाजता घेण्याचे सुचवतात. पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का? मोठ्या शहरात बायका नोकरी करतात. त्या घरी पोहोचेपर्यंत सात तर सहजच वाजून जातात. जर तुम्ही गृहिणी असाल तरीही सात आठ वाजता कामावरून घरी येणारी मंडळी, खेळून, क्लासवरून येणारी मुलं यांची उस्तावर कराल की जेवण कराल? थोडक्यात सांगायचे तर सर्वसामान्य भारतीय कुटुंबात दिव्यात वात आणि ताटात भात हे तत्त्व सध्याच्या काळात तरी सुसंगत वाटत नाही. पण याला उपाय म्हणून रात्री हलका आहार घेतला तर बरं होईल.

9. जमा आणि खर्च

आपले वजन कधी वाढते? जर कॅलरी इनटेक बर्नड कॅलरीजपेक्षा अधिक असेल तर. प्रत्येक व्यक्तीला तिच्या शाररीक हालचालींनुसार कमी जास्त प्रमाणात कॅलरीची गरज असते. हेल्थ ट्रॅकिंग ॲप्स जर तुम्ही वापर करत असाल तर तुमचे वय, लिंग, वजन, उंची आणि हालचाली (physical activities) यांच्या माहितीवरून तुम्हाला साधारण किती उष्मांकाची (कॅलरी ) गरज आहे ते ठरवले जाते. जर उष्मांकाचा जमा आणि खर्च यांचा मेळ बसत नसेल तर सगळयात आधी तो बसवा आणि फरक स्वतःच अनुभवा.

काही सवयी बदलून आणि साधे सोपे उपाय अमलात आणून तुम्ही वाढलेले वजन सहज कमी करू शकता.

तर मैत्रिणींनो, अश्या प्रकारे आज आपण काही सवयी बदलून आणि साधे सोपे उपाय अमलात आणून वाढलेले वजन सहज कमी कसे करायचे, याबद्दल माहिती जाणून घेतली. आशा करते की तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

लेखिका – सविता किरनाळे

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!