मराठी माणसाच्या अपमानामुळे उभे राहिलेले वानखेडे स्टेडियमचा रंजक इतिहास
क्रिकेट हा आपल्यासाठी किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे काही मी तुम्हाला नव्याने सांगायला नको. आज आपल्याला या खेळाने अनेक आनंदाचे क्षण आपल्या भारतीयांना दिले आहेत. मग 1983 चा वर्ल्डकप असो किंवा 2011साली वानखेडेवर जिंकलेला वर्ल्डकप असो. त्यामुळेच वानखेडेवरील त्या शेवटच्या षटकाराच्या आठवणी अजूनही आपल्या सर्व भारतीयांच्या स्मृतिपटलावर ताज्या आहेत. म्हणूनच आज वानखेडे स्टेडियमच्या रंजक इतिहासाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
ही साधारण 1970 च्या दशकातील गोष्ट आहे, जेव्हा मुंबईमध्ये क्रिकेटचा कारभार सांभाळणारी संस्था होती बीसीए (Bombay Cricket Association) जिचे आता नाव आहे एमसीए (Mumbai Cricket Association). त्या वेळचे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष होते बॅरिस्टर शेषराव वानखेडे. एक राजकारणी असल्या सोबतच एक फार मोठे क्रिकेटप्रेमी अशी त्यांची ख्याती होती त्यामुळेच ते बीसीए चे अध्यक्ष होते.
याच वेळेस त्यांच्याकडे काही आमदार बेनिफिट मॅच ठेवायचा प्रस्ताव घेऊन आले जी कल्पना शेषराव यांना फार आवडली व त्यांनी ब्रेब्रौन स्टेडियममध्ये हा सामना घ्यायचे ठरवले. याच वेळेस सीसीआयचे (Cricket Council of India) अध्यक्ष होते प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंट. वानखेडे यांसह आमदारांचे शिष्टमंडळ बेनिफिट मॅचचा प्रस्ताव घेऊन विजय मर्चंट यांची भेट घ्यायला गेले. मर्चंट यांनी पाहुण्यांचे आदरातिथ्य केले असले तरीही त्यांनी पाहुण्यांचा हा प्रस्ताव अगदी फेटाळून लावला.त्यामुळेच शब्दाला शब्द लागले आणि वाद वाढत गेला, वानखेडे म्हणाले जर तुम्ही अशीच अरेरावी केली तर तर आम्हा बीसीएला एक वेगळे क्रिकेट स्टेडियम बांधायला लागेल. यावर,
तुम घाटी लोग ये कभी नही कर पाओगे
असे अपमानजनक उत्तर विजय मर्चंट यांनी दिले. मर्चंट हे श्रीमंत गुजराती घराण्यातले होते आणि कदाचित संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा राग अजूनही त्यांच्या मनात होता.
आता स्टेडियम बांधायचं म्हणजे पुन्हा जागेची अडचण आलीच. चर्चगेट आणि मरीन लाईन्स रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडे एक भूखंड हा खेळण्यासाठी राखीव ठेवला होता तिकडे हॉकीचे सामने खेळले जायचे उरलेल्या भूखंडावर आधीच बीसीएने एक क्लब हाउस बांधायचे ठरवले होते. नवीन स्टेडियम बांधण्याच्या विषयावरून वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटले. नाईकांनी सांगितले की नवीन स्टेडियम बांधण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नव्हते, यावर वानखेडे म्हणाले साहेब तुम्ही फक्त होकार द्या, पैशांची व्यवस्था मी करतो.
अशाप्रकारे नवीन स्टेडियम बांधण्याची जबाबदारी ही एका 28 वर्षीय तरुण आर्किटेक्ट ‘शशी प्रभू’ यांवर सोपवली गेली, जे आज फार प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत. व अवघे ११ महिने २० दिवसांच्या कालावधीत बीसीएने सीसीए च्या नाकावर टिचचून वानखेडे स्टेडियम बांधले. अखेरीस वानखेडे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे स्टेडियमला त्यांचेच नाव देण्यात आले. व वानखेडे यांनी स्टेडियम बांधून मराठी माणसाचा झालेल्या अपमानाचा वचपा काढला.
आश्चर्याची गोष्ट ही आहे की आज याच वानखेडे स्टेडियम मध्ये एका स्टॅन्ड चे नाव विजय मर्चंट स्टँड असे आहे. या गोष्टीवरून आपल्याला आपण कधीही कोणाला कमी लेखू नये याची शिकवण मिळते.
आशा करतो आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका.
लेखक – सोहम लाडगांवकर