भारतीय वंशाच्या सर्वात जास्त दूध देणाऱ्या 10 देशी गायी | Top 10 Indigenous Cows in India
मित्रांनो, आपला भारत देश हा एक शेती प्रधान देश आहे. इथे अनेक शेतकरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून मोठया प्रमाणात दूध व्यवसाय करताना दिसतात. दूध व्यवसाय हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. कारण या व्यवसायातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास एक प्रकारे मदतच होते. पण मित्रांनो, दूध व्यवसाय करताना तो जर काळजीपूर्वक व योग्य रित्या केला तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनि दूध व्यवसाय सुरू करण्याआधी योग्य त्या दूध देणाऱ्या देशी गायीची निवड करायला हवी.
कारण आपल्या भारतात अश्या अनेक देशी गायी आहेत ज्यांची जर व्यवस्थित देखभाल केली तर त्या जास्त दूध देतात, अगदी दिवसाला 40 ते 50 लिटर दूध त्या सहज देतात. परंतु, देशी गायी म्हटल्या की त्या दूध खूप कमी देतात, असा शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर काही काळ आधी पाहिलं तर सहिवाल, गीर गाय, लाल सिंधी या गायीची प्रतिवेत 1500 ते 3000 लिटर दुध देण्याची त्यांची क्षमता होती.
पण जेव्हा पासून क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आला तेव्हा पासून आपल्या देशी गायींकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक देशी गायींची संख्या बऱ्याच प्रमाणात घटलेली दिसून येते. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना देशी गायींबद्दल माहिती व्हावी. व त्यांनी जास्तीत जास्त देशी गायींकडे परत वळावे हाच उद्देश घेऊन आम्ही आजचा हा लेख आणला आहे. त्यामुळे तुम्ही ही जर दूध व्यवसाय करत असाल किंवा जर तो व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
भारतातील सर्वात जास्त देणाऱ्या दूध गायी पुढीलप्रमाणे:-
1) सहिवाल गाय/ Sahiwal Cow
मित्रांनो, सहिवाल गाय ही भारतातील सर्वात उत्कृष्ट देशी गाय आहे. ही गाय साधारणपणे दहा महिने दूध देऊ शकते. या गायीचे दूध आणि तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मित्रांनो, तुम्ही शुद्ध साहिवाल गायीला तिच्या रंगावरून आणि आकारावरून ओळखु शकता. शुद्ध साहिवाल गाईचा रंग लाल- तपकिरी असतो. तर त्याचे पाय लहान आणि डोके रुंद असते. साहिवाल गायीचा कुबडा पूर्णपणे विकसित झाला असून त्यांच्या मानेखाली कातडी लटकलेली दिसते.
या गायीची खासियत म्हणजे ही गाय सर्व प्रकारच्या हवामानात म्हणजे अगदी शून्य डिग्री सेल्सिअस पासून ते अगदी पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा गी गाय राहू शकते. आणि हीच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली असते. ही गाय A2 प्रकारचे दूध देते, जे पचण्यास हलके असते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही भारतातील सर्वोत्कृष्ट गाय मानली जाते.
गायीचे नाव | सहिवाल |
---|---|
कुठे आढळते | उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब |
शरीराचे सरासरी वजन | 300 ते 400 किलो |
किती दूध देते | 40 ते 50 लिटर प्रति दिवस |
विविध जाती | लोला, लांबी बार, तेली , मांटगोमेरी आणि मुलतानी |
2) गीर गाय/ Gir Cow
मित्रांनो, गीर गाय ही देशातील अजून एक सर्वोत्कृष्ट मानली जाणारी गाय आहे. या गायीचे पहिले अस्तित्व गुजरातच्या गीर जंगलात सापडले होते, म्हणून त्यावरून या गायीला गीर गाय असे नाव पडले. मित्रांनो, गीर गाईचे कपाळ खूप मोठे व गोलाकार असते. तसेच या गायीचे कान लांब आणि खाली लटकलेले असतात. तसेच गीर गायीची मुख्य ओळख म्हणजे तिचा उंच कुबडा ही आहे. हा कुबडा जितका जास्त असेल तितकी गाय शुद्ध असते.
गीर गायीची त्वचा सुद्धा खूप चमकदार व मऊ असते. मित्रांनो, जर योग्य देखभाल केली तर गीर गाय एका दिवसात 15 ते 30 लिटर दुध देखील देऊ शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गीर गायीच्या दुधात 97 टक्के प्रथिने असतात आणि असे म्हटले जाते की या गायीच्या दुधात सोन्याचे गुणधर्म आढळतात. यामुळेच गीर गायीचे दुध आणि तूप हे खूप महाग असते.
गायीचे नाव | 2) गीर गाय |
---|---|
कुठे आढळते | गुजरात राज्यातील गीर जंगलात आणि महाराष्ट्र आणि राजस्थानच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तसेच ब्राझील मध्ये मोठया प्रमाणात आढळते |
शरीराचे सरासरी वजन | 400 ते 470 किलो |
किती दूध देते | दररोज 15 ते 30 लिटर |
विविध जाती | स्वर्ण कपिला, कृष्ण कपिला |
3) लाल सिंधी गाय/ Lal Sindhi Cow
मित्रांनो, या गायीच्या लालसर रंगामुळे तिला लाल सिंधी गाय असे नाव पडले. शरीराच्या आकाराने ही गाय सहिवाल गाईसारखीच असते. या गायीची शिंगे मुळाजवळ खूप जाड असतात. पशुपालक जास्त करून या प्रकारची गाय पाळतात कारण या गायींमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता जास्त असते. उच्च प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्या गायींमध्ये लाल सिद्धी गायीचा देखील समावेश आहे. पण भारतात यांची संख्या खूप कमी आहे.
गायीचे नाव | लाल सिंधी गाय |
---|---|
कुठे आढळते | देशात फक्त दोन ठिकाणी ही गाय उपलब्ध आहे. एक कृषी महाविद्यालय धुळे आणि कालसी, उत्तराखंड |
शरीराचे सरासरी वजन | 350 किलो पर्यंत |
किती दूध देते | दररोज 12 लिटर पेक्षा जास्त |
4) देवणी गाय/ Deoni Cow
महाराष्ट्रात दुहेरी उत्पादन साठी ही एकमेव गाय प्रसिद्ध आहे. म्हणजेच दुग्धउत्पादन आणि शेतीकाम अशी समान उपयुक्तता असणारी ही गाय आहे. या गायीचा मूळ रंग हा पांढरा असून त्यावर काळ्या रंगाचे अनियमित पट्टे असतात. या गायीची कातडी अतिशय मऊ, चमकदार व शरीराला घट्ट चिकटलेली असते.
गायीचे नाव | देवणी गाय |
---|---|
कुठे आढळते | कर्नाटकातील बिदर जिल्हा आणि महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आढळते |
शरीराचे सरासरी वजन | 450 किलो |
किती दूध देते | दररोज 5 ते 7 लिटर |
5) खिल्लार गाय/ Khillar Cow
मित्रांनो, खिल्लार गाय तिच्या उच्च दूध उत्पादन साठी ओळखली जाते. या गायीची शिंगे लांब आणि वक्र आकाराची असतात. उष्ण आणि दुष्काळी भागात या जातीची गाय उत्तम प्रकारे जुळवून घेते. आणि यामुळे तिच्या दूध उत्पादन वर कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच लहान दुग्ध व्यवसायासाठी ही एक आदर्श गाय आहे. या गायीची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असून ते सहसा 15 वर्षापर्यंत जगू शकतात. महाराष्ट्रात या गायी जास्त करून पाळल्या जातात.
तसेच शर्यतीसाठी, ओढकाम करण्यासाठी देखील या गायीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आटपाडी, म्हसवड, तपडी, नकली खिलार, आणि खान्देशी खिलार अश्या उपजाती देखील इथे आढळतात.
गायीचे नाव | खिल्लार गाय |
---|---|
कुठे आढळते | पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा |
शरीराचे सरासरी वजन | 350 ते 450 किलो |
किती दूध देते | दररोज 8 ते 12 लिटर |
6) राठी गाय/ Rathi Cow
मित्रांनो, सहिवाल, थारपारकर आणि लाल सिंधी या गायींपासून ही राठी गाय तयार झाली आहे. राजस्थान मधील राठ समाज अनेक वर्षांपासून या गायीच संगोपन करत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी आहारात सुद्धा या गायी चांगले दूध उत्पादन देतात. याची दूध उत्पादन क्षमता सहिवाल सारखीच आहे. या गाई 18 ते 20 वर्षे पर्यंत जगू शकतात. तसेच या गायींचा आकार मध्यम असून त्यांचे अंग भरीव असतेआणि त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात.
गायीचे नाव | राठी गाय |
---|---|
कुठे आढळते | राजस्थान |
शरीराचे सरासरी वजन | 250 ते 300 किलो |
किती दूध देते | दररोज 16 ते 20 किलो |
7) थारपारकर गाय/ Tharparkar Cow
मित्रांनो, थार वाळवंट पार करून जायची ज्याची क्षमता आहे ती म्हणजे थारपारकर गाय. या जातीला व्हाइट सिंधी, कच्ची, आणि थारी असेही म्हणतात. थारपारकर गायी या मध्यम आकाराच्या असतात आणि त्यांच्या त्वचेचा रंग पांढरा किंवा हलका राखाडी असतो. देशात या गायीची संख्या खूप कमी राहिली आहे. या गायीला कृष्णाची गाय असे ही म्हणतात. या गायी प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम दूध देतात. त्यांची देहयष्टी मोठी असून त्यांची रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली असते.
गायीचे नाव | थारपारकर गाय |
---|---|
कुठे आढळते | थार वाळवंट |
शरीराचे सरासरी वजन | अंदाजे 400 किलो |
किती दूध देते | दररोज 10 ते 14 लिटर |
8) डांगी गाय/ Dangi Cow
मित्रांनो, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत ही ही गाय उत्तम प्रकारे टिकते. या गायीच्या अंगावर काळ्या रंगाचे छोटे मोठे गोल टिपके असतात. यांची शिंगे लहान व गोलाकार असतात. या गायीची कातडी नेहमी तेलकट असते. या गायी जास्त करून डोंगराळ भागात चरण्यासाठी जातात. त्यामुळे त्या काटक आणि ताकदवान असतात.
गायीचे नाव | डांगी गाय |
---|---|
कुठे आढळते | नाशिक, अहमदनगर, ठाणे, उत्तर महाराष्ट्र, गुजरातच्या डांग भागात |
शरीराचे सरासरी वजन | 200 ते 250 किलो |
किती दूध देते | दररोज 6 लिटर पर्यंत |
9) कोकण कपिला/ Konkan Kapila Cow
मित्रांनो, ही खासकरून कोकणातील गाय आहे. या गायीचा रंग शक्यतो काळा, तपकिरी असतो. शिवाय दमट वातावरणात तग धरून ठेवण्याची तिची क्षमता जास्त असते. या गायीचे वय साधारणपणे18 ते 20 वर्षांचे असते. यांच्या शरीराच्या तुलनेत डोके मध्यम आकाराचे आणि निमुळते असते. या गायीचे कान मध्यम आकाराचे आणि टोकदार असतात. यांची शिंग पाठीमागे वर जाऊन किंचित आत वाळलेली आणि टोकदार असतात.
यांचे पाय काटक आणि मजबूत असून पर्वतीय क्षेत्रात फिरण्यासाठी अनुकूल असतात. या गायीची चाऱ्याची गरज कमी असून त्यांची निगा राखण्याची सुद्धा फारशी आवश्यकता नसते.
गायीचे नाव | कोकण कपिला |
---|---|
कुठे आढळते | मुख्यत्वे कोकणात |
शरीराचे सरासरी वजन | 200 ते 225 किलो |
किती दूध देते | प्रतिदिन 5 ते 6 लिटर |
10) लाल कंधार गाय/ Lal Kandhari Cow
मित्रांनो, या गायीचे पालनपोषण करायला फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. शिवाय त्यांना खायला जास्त चारा ही लागत नाही. या गायी दुहेरी कामासाठी उपयुक्त आहेत. म्हणजे दुधासोबत ओझेकाम करण्यासाठी देखील यांचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात आढळणाऱ्या या लाल कंधार गायीची जात चौथ्या शतकात कंधारच्या राजांनी विकसित केल असल्याचे सांगितले जाते. तसेच या जातीच्या गायी डार्क तपकिरी आणि डार्क लाल रंगाच्या असतात. त्यांचे कान लांब असून खालच्या दिशेने वाकलेले असतात. तर शिंगे लहान असून दोन्ही बाजूंनी सरळ रेषेत पसरलेली असतात.
गायीचे नाव | लाल कंधार गाय |
---|---|
कुठे आढळते | नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका, उत्तर कर्नाटक |
शरीराचे सरासरी वजन | 330 ते 350 किलो |
किती दूध देते | 3 ते 5 लिटर |
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायी कोणत्या आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद.
Tags: Sahiwal Gai info in Marathi, Sahiwal Cow Marathi, Gir Gai info in Marathi, Gir Cow Marathi, Lal Sindhi Gai info in Marathi, Lal Sindhi Cow Marathi, Deoni Cow info in Marathi, Deoni Cow Marathi, Khillar Cow Marathi, Khillar Gai info in Marathi, Rathi Cow Marathi, Rathi Gai info in Marathi, Tharparkar Cow Marathi, Tharparkar Gai info in Marathi, Dangi Cow Marathi, Dangi Gai info in Marathi, Konkan Kapila Cow Marathi, Konkan Kapila gai info in Marathi, Lal Kandhari Cow Marathi, Lal Kandhari Gai info in Marathi, Jast Dudh Denarya Desi Gai, Jast Dudh Desi Gai Mahiti, Desi Gai Mahiti, Top Desi Gai Mahiti