आरोग्य टिप्स | Health Tips in Marathi

अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजी | Best Tips to Stay Healthy in Rainy Season Marathi

पावसाळा म्हणजे रिमझिम धारा ते प्रचंड कोसळधार… पावसाळा म्हटलं की एरवी दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या ते आलं घातलेला गरमागरम चहा आणि चटकदार कांदाभजी… पावसाळा म्हणजे मस्त भाजलेलं मक्याचं कणीस आणि वाफळणारं सूप…. आणि पावसाळा म्हणजे चोंदलेलं नाक, तापलेलं अंग, क्वचित कॉलरा, मलेरिया आणि डेंग्यू सारखे रोगही… पण व्यवस्थित काळजी घेतली की पावसाळा अतिशय आनंददायी होऊ शकतो. कसं ते समजून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. 

Best Tips to Stay Healthy in Rainy Season Marathi

पावसाळ्यात या गोष्टी आवर्जून करा

  1. पावसाळ्यात फारशी तहान लागत नाही. परंतु ठराविक अंतराने स्वच्छ पाणी पित रहा. पण हे पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असल्याची खात्री करुन घ्या. कारण पावसाळ्यात अस्वच्छ आणि प्रदूषित पाण्याचा पुरवठा होणे अगदीच शक्य आहे. असे पाणी पिल्याने कॉलरा, टायफॉइड सारखे रोग होऊ शकतात. हे टाळण्यासाठी उकळलेले किंवा वॉटर प्युरिफायरमधील पाणी प्या. 
  2. या ऋतूमध्ये निरनिराळ्या रानभाज्या आणि रानमेवा बाजारात उपलब्ध होतात. हल्ली सर्व ऋतूत मिळणाऱ्या फुलकोबी, कोबी, सिमला मिरची यासारख्या भाज्या अनेक प्रकारची कीटकनाशक, जंतुनाशक आणि रासायनिक खतांचा भरमसाठ उपयोग करून पिकवल्या जातात. त्यामुळे त्या आरोग्यासाठी फारशा चांगल्या नसतात. पण रानभाज्या पहिल्या पावसाबरोबर नैसर्गिकरीत्या उगवून येतात. त्यामुळे त्या पुर्णपणे ऑरगॅनिक असतात तसेच त्यांचे पोषणमूल्य उच्च असते म्हणूनच पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी रानभाज्या आणि रानमेवा खाणे उपयुक्त ठरते
  3. पावसाळ्यात चमचमीत पदार्थ खावेसे वाटते. म्हणून जरा उघडीप मिळाली की आपला मोर्चा आपोआप चाट सेंटरकडे वळतो. पण अशा वातावरणात रस्तावर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाणे म्हणजे निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देणेच होय. कारण हे पदार्थ बनवताना वापरलेल्या भाज्या, पाणी आणि इतर कच्या मालाची गुणवत्ता तसेच ज्या ठिकाणी ते अन्न शिजवले जाते तिथली स्वच्छ्ता यात तडजोड केली गेली असण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो उघड्यावर मिळणारे पदार्थ खाऊ नका.
  4. पावसाळयात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून या ऋतूत कच्च्या भाज्या, मोड आलेली कच्ची कडधान्य खाऊ नये. त्यांच्यामुळे पोटदुखी, गॅसेसचा त्रास होऊ शकतो. भाज्या आणि मोड आलेली कडधान्ये कच्ची खाण्याऐवजी ती उकडून खाल्ली तर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात. या गोष्टी उकडून खाल्याचा अजून एक फायदा म्हणजे उकडल्याने दमट हवामानात या पदार्थांवर वाढणाऱ्या जीवाणूंचा नाश होतो. पर्यायाने रोगापासून बचाव होतो. 
  5. पावसाळयात शिळे अन्न, तळलेले, आंबवलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळा. कितीही खावेसे वाटले तरी तळलेले पदार्थ प्रमाणातच खा आणि खोकला ताप यापासून स्वतःचा बचाव करा. 
  6. रिमझिम पाऊस पडताना दिसला की त्यात भिजायचा मोह कुणालाही आवरत नाही. पण नेहमीच असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण पावसाच्या पाण्यात धूळ आणि अनेक प्रदूषके मिसळलेली असतात. ती आपल्या त्वचा आणि केसांवर साठून त्यांना हानी पोचवू शकतात. त्याचप्रमाणे भिजल्याने सर्दी पडसे सारखे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला भिजायचेच असेल तर मात्र त्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करणे गरजेचे आहे. असे केल्याने सर्दी तसेच प्रदूषकांचा परिणाम कमी होतो. साठलेल्या पाण्यात लेप्टोसारख्या रोगाचे जंतू, अमिबासारखे सूक्ष्मजीव असू शकतात. म्हणून डबक्यात, घाण पाण्यात पाय घालू नका. घरी आल्यावर हातपाय साबण लावून स्वच्छ धुवा. 
  7. डासांपासून बचावपावसाळ्यात डास सगळीकडे जणू उच्छाद मांडतात. डास चावल्याने मलेरिया, डेंग्यू सारखे जीवघेणे आजार होतात. म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरात डासांपासून बचाव करण्यासाठीची मलम, मिस्क्विटो रिपेलंट लिक्वीड, अगरबत्ती किंवा डास मारण्यासाठीची इलेक्ट्रिक रॅकेट, मच्छरदाणी इत्यादि गोष्टी आणून ठेवा आणि त्यांचा वापर करा. संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडताना शक्यतो पुर्ण बाह्यांचे कपडे घाला. घरात आणि घराच्या आसपास कोठेही पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  8. चाचण्या आणि तपासणी पुर्ण काळजी घेवूनही जर आजारी पडलात तर दुखणं अजिबात अंगावर काढू नका. अनेक आजारांची लक्षणे ही ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा येणे, सांधेदुखी अशी सर्वसामान्य असतात. अशावेळी ताबडतोब दवाखान्यात जाऊन योग्य त्या चाचण्या आणि तपासणी करून घ्या. या चाचण्या डॉक्टरांना आजाराचे निदान करण्यास आणि उपाचारप्रणाली ठरवण्यात मदत करता. म्हणून त्या चाचण्या करून घेण्यात हयगय करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेवून आपण वेळीच आजारावर मात करु शकतो. 
Rainy Season Health Tips in Marathi

पावसाळ्यात आहार कसा असावा ?

  1. मक्याचे कणीस पावसाळ्यात उपलब्ध होणारे मक्याचे कणीस आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. अगदी एक दिवसाआड जरी तुम्ही मक्याचे कणीस भाजून किंवा उकडून खाल्लं तरी त्याचे अनेक फायदे होतात. आता ते कणीस नुसतं भाजून खायचं किंवा उकडून त्याचे चाट वगैरे बनवून खायचं हे तुमच्यावर आहे. पण या धुंद ऋतूत मक्याच्या कणसाचा आनंद जरूर घ्या. 
  2. काळी मिरी आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून काळी मिरी अतिशय गुणकारी समजली जाते. ही छोटीशी मिरी अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते आणि पदार्थाची लज्जत वाढवते. पावसाळ्यात सर्दी पडसे यांनी हैराण झाला असाल तर काळी मिरी पावडर चहामध्ये उकळून प्या. भाजीमध्ये चिमूटभर मिरपूड घाला. तुम्ही ती सूपमध्ये घालून किंवा सलाडवरील ड्रेसिंगच्या रूपातसुध्दा सेवन करू शकता. पण रोजच्या आहारात काळया मिरीचा आवर्जून समावेश करा.
  3. हळदहळद जंतुनाशक, रोगनिवारक असल्याची माहिती जवळजवळ प्रत्येकाला असते. पावसाळयात होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. ती तुम्ही पाण्यात उकळून पिऊ शकता किंवा दुधात घालून ही पिऊ शकता. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक्षमता वाढते तसेच शरीरातील रोगजंतूंचे निवारण होते. 
  4. दही, ताज्या भाज्या आणि फळंपावसाळयात जास्त आंबट नसलेल्या दह्याचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करा. कारण दह्यामधील चांगले जीवाणू (good bacteria) पचनास मदत करतात. म्हणून दही, योगर्टचे सेवन या ऋतूत फायदेशीर ठरते. ताज्या भाज्या आणि फळं शरीराला आवश्यक जीवनसत्त्व, खनिज आणि तंतुमय पदार्थांचे उत्तम स्रोत असल्याने रोज एकतरी फळं नक्की खा. संत्री, मोसंबी, सफरचंद, जांभूळ, सीताफळ ही फळं खाणे उपयुक्त ठरू शकते. 

आशा आहे की या लेखातील माहिती पावसाळयात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास उपयुक्त ठरेल.



नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!