Share MarketSidebar Post

शेअर बाजार खरंच जुगार आहे का?

आपण बऱ्याचवेळा या संदर्भात अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. की कश्याप्रकारे अनेक लोकं या शेअर बाजारामुळे आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले. शेअर बाजारात कधी तरी पैसे मिळतात पण जास्त वेळा पैसे जातातच. शेअर बाजार म्हणजे एक जुगारचं आहे. अश्या प्रकारच्या कितीतरी गोष्टी आपल्या कानावर पडत असतात. मग कळत नकळत आपल्या मनात हे कधी ना कधी तरी येऊन गेलेलं असतं. याच विषयावर आपण आज या लेखात चर्चा करणार आहोत.

Share Market Jugar Ahe Ka

सुरवात करण्याआधी माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला, “तुम्हाला पोहता येतं का”?



अर्थातच या प्रश्नाचं तुमचं उत्तर एकतर “हा” असेल किंवा “नाही” असेल. आता तुम्हाला पोहता येत असेल आणि तुम्ही पाण्यात उडी मारली, तर तुमची बुडण्याची शक्यता किती असेल? अर्थातच खूप कमी असेल. अगदीच नाही च्या बरोबर असेल ही शक्यता. पण जर तुम्हाला पोहताच येत नसेल आणि तुम्ही पाण्यात उडी मारली तर?… अर्थातच बुडण्याची शक्यता जास्तच असेल. तेव्हा नशीबच तुम्हाला वाचवू शकेल.

मला नक्की काय म्हणायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. म्हणजेच जर तुम्हाला शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर आधी तुम्हाला शेअर बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे पैसे बुडण्याची शक्यता तुम्हाला कमी करता येईल. आता शेअर्सचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं? तर आधी शेअर बाजार नक्की काय आहे ते समजून घ्यायचं. एक उदाहरण घेऊन आपण शेअर बाजार नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करु.

तर तुमच्या ओळखीची एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला उत्तम भजी बनवता येतात आणि तो चहा पण खूप छान बनवतो. ती व्यक्ती व्यवहाराला पण चोख आहे. आता त्या व्यक्तीला चहा आणि भजीचं दुकान टाकायचं आहे आणि त्याला पैश्याची गरज आहे. त्या पैश्याच्या मोबदल्यात ती व्यक्ती तुम्हाला त्या दुकानातून होणाऱ्या फायद्यातून काही पैसे तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देणार का?

अर्थातच हो… ! कारण आपण त्या व्यक्तीला ओळखतो. त्याचा व्यवहार चोख आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. एकंदरीतचं आपला त्या व्यक्तीवर ‘विश्वास’ आहे. शेअर बाजार पण नेमका असाच आहे. आपण ज्या कंपनीने शेअर्स विकत घेत आहोत त्या कंपनी वर आपला विश्वास असायला हवा. त्या साठी त्या कंपनीचा मागचा परफॉर्मन्स कसा आहे आणि भविष्यात त्या कंपनीच्या काय योजना आहेत. त्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी पूरक आहेत का? याचा नक्की विचार करावा. हा अभ्यास करणं जमू लागलं की शेअर बाजारात उतरण्याची तुमची पहिली पायरी यशस्वी झाली समजा.

आता याचं एक उदाहरण आपण पाहू. हे उदाहरण अभ्यास म्हणून पहा. आणि त्यानुसार तुमचे तर्क वापरून तुमचे भविष्यातील अंदाज बांधा.



‘टाटा’ हे नाव ऐकलं की आपल्या मनात एक प्रकारचा विश्वास येतो. मागील बऱ्याच वर्षांपासून टाटा ग्रुप ने लोकांच्या मनात एक विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे जणू समीकरणचं झालं आहे. त्यामुळे टाटा समूहातील काही शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. आता टाटा चे एवढे शेअर्स बाजारात असताना नेमकं कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न पडतो. मग सध्याची थोडी परिस्थिती पाहू. सध्या जागतिक कल आहे की पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या वाहनांकडून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे जाण्याचा कल आहे. आणि टाटा समूह यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. टाटा मोटर्स ही वाहन बनवणारी टाटा ची कंपनी या क्षेत्रात सध्यातरी अग्रेसर आहे. तर टाटा पॉवर ही वीजनिर्मिती करणारी कंपनी जास्तीतजास्त चार्जिंग स्टेशन बनवण्यावर भर देत आहे. त्यामुळे या कंपनी मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकेल.

हा झाला एक अंदाज. असेच विविध क्षेत्रात असलेल्या कंपनी आणि त्यांच्या कामाचा आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज आपण बांधू शकलो तर शेअर बाजारात आपण एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणूकीवर छान परतावा मिळवू शकू. हा जसा गुंतवणूकदार म्हणून अभ्यास झाला तसा इन्ट्राडे किंवा डिलीव्हरी ट्रेंडिंग साठी वेगळा अभ्यास करावा लागतो.

अगदी सहज सोप्या भाषेत शेअर बाजार समजून घायचा असेल तर असं समजा की शेअर बाजार लोकल ट्रेनच्या प्रवासा सारखा आहे.

म्हणजे तुम्ही लोकल ट्रेन ने का प्रवास करता? तो करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?

आपण लोकल ट्रेन नी प्रवास करतो कारण रस्त्यावरील वाहतुकीने प्रवास करताना लागणाऱ्या वेळे पेक्षा लोकल ट्रेन नी प्रवास केल्यावर वेळ कमी लागतो. म्हणजेच वेळ वाचतो. तसंच शेअर बाजारामध्ये देखील तुमच्या पैशावर कमी वेळेत जास्त परतावा देण्याची ताकत आहे. म्हणजेचं फिक्स डिपॉझिट किंवा इतर माध्यमातून पैसे वाढण्यास लागणारा वेळ, शेअर बाजारातून कमी करता येतो.

लोकल ट्रेन मध्ये काही प्रवासी हे निवांत खिडकी शेजारी बसलेले असतात. त्यांना कसलीही घाई नसते. अगदी शेवटच्या स्थानकावर उतरायचे असते. ते असतात ‘गुंतवणूकदार’. जे चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि त्यांना वाढण्याचा वेळ देतात.

काही लोकं ही मध्ये उभी असतात, त्यांना आधल्या मधल्या कुठल्या तरी स्टेशन वर उतरायचे असते. ते असतात स्विंग ट्रेडर्स. म्हणजे एखादा शेअर्स घायचा, काही दिवस आपल्या जवळ ठेवायचा आणि मग नफा पाहून विकून टाकायचा.

आणी त्यानंतर येतात, इन्ट्राडे ट्रेंडिंग करणारे. हे लोकल ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहणारे प्रवासी. जवळपास प्रत्येक स्थानकावर उतरून पुन्हा लोकल मध्ये चढणारे. तसेच हे इन्ट्राडे ट्रेंडिंग करणारे रोज काही प्रमाणात शेअर्स घेत असतात आणि विकत असतात.

शेअर बाजारात पैसे गमावण्याची लोकांना भीती असते तर लोकलच्या गर्दीत लोकांना आपला जीव गमावण्याची भीती असते.

लोकल ट्रेन प्रवासात सकाळ आणि संध्याकाळची वेळ या दोन वेळा खूप घाई च्या असतात. तसंच शेअर बाजारात शेअर बाजार जेव्हा वेगात वर जात असतो किंवा कोसळत असतो तेव्हा फार महत्वाच्या वेळा असतात. शहाणा ट्रेडर जेव्हा शेअर बाजार चढत असतो तेव्हा नफा कमवून बाजूला होतो आणि उतावळा ट्रेडर शेअर वर जतोय म्हणून गुंतवणूक करत असतो. तर जेव्हा बाजार कोसळत असतो तेव्हा नेमकी उलटी परिस्थिती असते. शहाणा ट्रेडर तेव्हा गुंतवणूक वाढवून शेअर्सची किंमत अव्हेरेंज करत असतो तर उतावळा ट्रेडर लवकरात लवकर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो.

शेअर बाजा आणि लोकल त्यांना आपापली अशी शिस्त असते. जे कोणी शेअर बाजार आणि लोकल ट्रेन यांना जवळून ओळखतात त्यांनाच ही शिस्त माहीत असते. त्यामुळे जे कोणी नवखे या क्षेत्रात येतात ते शेअर बाजारात आपले पैसे गमावून बसतात आणि लोकल ट्रेन मध्ये भरडले जातात.

त्यामुळे शेअर बाजार एक जुगार नसून एक अभ्यास आहे. तो अभ्यास करूनच शेअर बाजारात पाऊल ठेवावे. तरंच तुमचा निभाव लागेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!