न्यू मेक्सिको, मंत्रमुग्ध करणारी जागा
या प्रदेशाचा पहिला लिखित अहवाल स्पॅनिश जेत्यांनी केलेला सापडतो. जेव्हा त्यांनी 16 व्या शतकात या क्षेत्राचा शोध घेतला तेव्हा मूळ अमेरिकन पुएब्लोस यांचा सामना करून त्यांचा पराभव केलेला. तेव्हापासून, स्पॅनिश साम्राज्य, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स (1787 पासून) यांनी या क्षेत्रावर नियंत्रण असल्याचा दावा करतात.
ते न्यू मेक्सिकोला मंत्रमुग्ध करणारी जागा (द लँड ऑफ एन्चान्टमेन्ट) म्हणतात, पण स्थानिक मात्र याला गुंतवून ठेवणारी जागा (द लँड ऑफ एंट्रॅपमेंट) म्हणतात. बरेचदा लोकं भेट द्यायला येतात आणि तिकडचेच होऊन जातात.
असो तर इथल्या सोन्याच्या काही सुरस कहाण्या पाहूया
1) कॅबॅलो पर्वत
याला हॉर्स माउंटन देखील म्हणतात, ज्याची शिखरे लास क्रूसेस, न्यू मेक्सिकोच्या उत्तरेस 35 मैलांवर आहेत. कॅबेलो कॅन्यनच्या मोठ्या खडकाखाली एका झऱ्यात सोन्याच्या विटा, चांदी आणि दागिने दफन केले आहेत- अशी आख्यायिका आहे. दफन केलेला माल रेड इंडियन उठावाच्या वेळी चिहौहुआ-स्पॅनिशांकडून रेड इंडियन्सनी चोरला होता. खजिन्याची गरज नव्हती तरी त्यांनी या खुनी छाप्यांनंतर माल घोडे आणि खेचरांवर लादून लपवण्याच्या जागेवर नेला आणि पुरून टाकला. हे सोने कधीच सापडले नाही.
2) कोलफॅक्स काउंटी – पॉइंट ऑफ रॉक्स
1851 मध्ये दोन पायनियर्सनी जुन्या सांता फे ट्रेलवरील कॅम्प साइटजवळ आणि पॉईंट ऑफ रॉक्सजवळ $40,000 सोन्याची नाणी पुरल्याचे सांगण्यात येते. कोलफॅक्स काउंटीमधील पॉइंट ऑफ रॉक्स खाजगी जमिनीवर आहे, यूएस हायवे 56 वरील रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्कच्या उत्तरेस आठ मैल आणि दोन मैल पूर्वेस पडतो. हा ही छुपा खजिना कधीच सापडला नाही.
या जागेशी जोडली गेलेली अजून एक आठवण म्हणजे डॉक हॉलीडे, तोच अर्प वायटचा सोबती, एक निष्णात शूटर. याने त्याचा पहिला बळी येथेच घेतला होता न्यू मेक्सिकोमध्ये.
खरा डॉक / सिनेमातील डॉक (tombstone movie) हा खराखुरा दंतवैद्य होता, जो नंतर टूम्बस्टोनला गेला आणि अर्प वायटचा मित्र बनला.
न्यू मेक्सिकोची काही वैशिष्ट्ये
शिपरॉक पर्वत – पुरातन ज्वालामुखीचे सुंदर अवशेष
ताओस पुएब्लो – 1000 वर्षांहून अधिक काळ लोकं येथे राहत आहेत, सध्या वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे.
रोड रनर – कार्टूनमधला खराखुरा पक्षी जो बॉस्क डेल अपाची नॅशनल वाईल्डलाईफ रेफ्युजमध्ये आढळतो.
सॅन गेरोनिमो चर्चचे अवशेष – ताओस पुएब्लोमधील स्पॅनिश वसाहतीचा एक भाग. 1846 मध्ये मेक्सिकन-अमेरिकन युद्धादरम्यान अमेरिकन तोफांच्या माऱ्याने ही इमारत मोठ्या प्रमाणात नष्ट झाली होती.
चुनखडीची गुंफा – कार्ल्सबॅड केव्हर्न्स नॅशनल पार्कमधील चुनखडीच्या डझनभर मोठ्या गुहांपैकी एकाचा आतील भाग
एल सॅनचुरिओ दे चिमायो – एक कॅथोलिक चर्च आणि नॅशनल हिस्टोरिक लँडमार्क, चिमायो, न्यू मेक्सिको येथे आहे. चर्च 1816 मध्ये बांधले गेले होते आणि दरवर्षी पवित्र आठवड्यात हजारो तीर्थयात्रेला भेट देतात.
पेट्रोग्लिफ्स – चाको कल्चर नॅशनल हिस्टोरिकल पार्कमध्ये उना विदा ट्रेलच्या बाजूने हे दिसतात.
व्हॅली ऑफ ड्रीम्स – न्यू मेक्सिकोच्या बिस्ती/डे-ना-झिन वाइल्डनेस एरियामधील एलियनचे सिंहासन (एलियन थ्रोन)
तर अनेक रहस्यांनी भरलेला आणि भारलेला प्रदेश आहे न्यू मेक्सिको. पण सर्वात गाजलेली आणि रहस्यमयी असलेली घटना म्हणजे
ट्रबुकोचा खजिना
- केस फाइल: ट्रॅबुको ट्रेझर
- स्थान: फार्मिंग्टन, न्यू मेक्सिको
- तारीख: जुलै 1933
- वर्णन: खजिन्यामध्ये न्यू मेक्सिकोमध्ये कुठेतरी पुरलेल्या अनेक सोन्याच्या विटांचा समावेश आहे.
इतिहास: 1933 मध्ये, लिओन ट्रॅबुको हे मेक्सिकन लक्षाधीश होते. त्याला विश्वास होता की तो युनायटेड स्टेट्सच्या महामंदीचा उपयोग आपले नशीब वाढवण्यासाठी करू शकतो. युनायटेड स्टेट्स लवकरच डॉलरचे अवमूल्यन करेल आणि सोन्याचे भाव गगनाला भिडतील याची खात्री पटल्याने ट्रॅबुको आणि इतर चार पुरुषांनी मेक्सिकोतील सोन्याचा बराचसा साठा युनायटेड स्टेट्समध्ये पुन्हा विकण्यासाठी विकत घेतला जेव्हा भविष्यात सोन्याची किंमत वाढेल तेव्हा पुन्हा दामदुप्पट भावात विकण्यासाठी.
तात्पुरत्या मेक्सिकन फाउंड्रीमध्ये, सोन्याची नाणी आणि दागिने वितळले गेले आणि त्यापासून विटा बनवल्या. तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, त्याने आणि भागीदारांनी जवळपास सोळा टन घन सोने गोळा केले होते. जर त्यांनी युनायटेड स्टेट्समध्ये सोन्याची तस्करी केली आणि पकडले गेले असते तर त्यांना दीर्घ तुरुंगवास भोगावा लागला असता. ट्रॅबुकोने बेकायदेशीर खजिना लपवण्यासाठी सुरक्षित जागा शोधली, परंतु अखेरीस, त्याने ठरवले की सोने दफन करणे अधिक सोपे आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये, ट्राबुकोसाठी न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अनेक गुप्त उड्डाणे करण्यासाठी रेड मॉइसर नावाच्या वैमानिकाची नेमणूक ट्रबुकोच्या पार्टनरने केली.
असे मानले जाते की ट्रॅबुकोने न्यू मेक्सिकोमधील युटे आणि नवाजो नामक रेड इंडियन आरक्षणाजवळील विरळ लोकसंख्या असलेला प्रदेश निवडला. मॉइसरने कथितपणे सोळा उड्डाणे केली, प्रत्येक वेळी एक टन सोने वाहून नेले, ते पिक-अप ट्रकमध्ये टाकून त्यांना दफन स्थळापर्यंत नेले गेले. ट्रॅबुकोने कधीही स्थान उघड केले नाही आणि नकाशा तयार न करण्याची काळजी घेतली. जेव्हा 1934 चा गोल्ड रिझर्व्ह कायदा पास झाला तेव्हा सोन्याच्या किमती वाढल्या, परंतु त्यांनी किंमती अजून वाढण्याची वाट पाहिली.
दुर्दैवाने, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट यांनी 1934 च्या सुवर्ण कायद्यावर सही करून शिक्कामोर्तब केलं ( गोल्ड रिझर्व्ह एक्ट) ज्याने सोन्याची खाजगी मालकी बेकायदेशीर बनवली आणि ट्रॅबुको त्याच्या योजनेत अधिक पैसे मिळवू शकला नाही. येणाऱ्या काही वर्षांत तो आणि त्याचे भागीदार अकाली मृत्यू पावले. ट्रॅबुकोने सोन्याचे गूढ दफनस्थान आपल्या कबरीपर्यंत नेले.
ट्रेझर हंटर एड फॉस्टरने पस्तीस वर्षांपासून फार्मिंग्टन, न्यू मेक्सिकोच्या आसपासच्या वाळवंटात ट्रॅबुकोचा खजिना शोधत आहेत. त्याला खात्री आहे की त्याला कॉनगर मेसा नावाच्या पठारावर रेड मॉइसरने वापरलेली 1933 ची लँडिंग पट्टी सापडली. त्यांनी 1933 मध्ये सहा वर्षांची मूळ अमेरिकन महिला आणि नावाजो स्त्री यांच्याशी बोलले आहे, ज्या दोघांनीही तेथून उतरणारे आणि टेक ऑफ करणारे विमान आठवले. एड म्हणाले की तिला (अमेरिकन नावाजो स्त्री) आरक्षित भागात राहणारे अनेक मेक्सिकन पुरुष आठवले (ज्यांनी ट्रबुकोला यात मदत केली होती).
मेसाच्या पश्चिमेस सुमारे वीस मैल अंतरावर असलेल्या आरक्षणावर त्याला विचित्र पण खूप जुने नावाजो घर सापडले. हे बहुधा सोन्याचे रक्षण करण्यासाठी रक्षक चौकी म्हणून बांधले गेले असावे. खिडक्या, समोरचा दरवाजा, मागील दरवाजा आणि व्हरांडा असलेली ही मेक्सिकन शैलीची रचना आहे. तिथूनच काही दूर असलेल्या श्राइन रॉकवर तारीख आणि शब्द कोरलेले आहेत: “1933 16 टन.” एडचा विश्वास आहे की या तीन बिंदूंच्या आसपास सोने कुठेतरी लपवले गेले असावे.
ट्रेझर हंटर नॉर्मन स्कॉटचा असा विश्वास आहे की ट्रॅबुकोचा खजिना अस्सल आहे. त्यांचा असा विश्वास आहे की नवीन उपलब्ध तंत्रज्ञानामुळे ते शोधून काढणे हे आधुनिक काळात सहज शक्य आहे.
- पार्श्वभूमी: असे मानले जाते की खजिन्यात अनेक लक्षाधीशांनी विकत घेतलेले मेक्सिकन सोने होते.
- तपास मोहिमा: एक ही नाही
- परिणाम: निराकरण न झालेले.
अश्याच बऱ्याच कहाण्या न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात विखूरल्या आहेत आणि आपल्याला अगत्याचे आमंत्रण देत आहेत.
चालताय ना मग?