एक असाही युगान्त !! अंडर टेकर
22 नोव्हेंबर 2020 एक साधारण तारीख, पण या दिवशी एका युगाचा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना कळणार नाही मी काय म्हणतोय ते. त्या दिवशी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (डब्लू डब्लू ई ) मधून अंडर टेकरने निवृत्ती घेतली.
80 ते 90 च्या दशकात जन्मलेल्या मुलांना आणि मुलींना देखिल अंडर टेकर ठाऊक असतो. तेव्हा त्याला अंडरडेकर म्हटलं जायचं आमच्यात. लहानपणी खेळताना सगळ्यांना हल्क हॉगन बनायचं असायचं, मला पण – आम्ही बचपन से लंबू ना, मग मला अंडरटेकर बनाव लागायचं. आज ते आठवून हसायला पण येत आणि बरं पण वाटतं.
आताच्या 1 एप्रिल 2022 ला त्याला डब्लू डब्लू ई च्या 2022 च्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलं गेलं त्याचा व्हिडिओ पाहताना सगळं आठवून गेलं. तब्बल 3 दशके चालणारे करियर, असंख्य उतार चढाव, अगणित मॅचेस आणि सर्वात शेवटी अंडरटेकर नामक आभासी व्यक्तिमत्वाला उभं करून हा डोलारा टिकवणारा मार्क कॅलावे – निव्वळ अद्भुत!!!
याने WWE च्या दुनियेत पाऊल ठेवलं तेव्हा मी निव्वळ पहिलीत होतो, जेमतेम 5-6 वर्षांचा. आज हा हॉल ऑफ फेमचा मानद सदस्य झालाय आणि मी आहे 35 च्या वर. म्हणजे मी पण याच्या 30 वर्षांच्या प्रवासाचा एक साक्षीदार, अनेकांसारखा.
- वेस्टर्न मॉर्टीशिअन 1990-94
- द डेडमॅन (डार्कनेस इरा) ऑगस्ट 1994 – ऑक्टोबर 1996
- लॉर्ड ऑफ डार्कनेस नोव्हेंबर 1996 – डिसेंबर 1998
- मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस जानेवारी 1999 – सप्टेंबर 1999
- अमेरिकन Badass मे 2000 – नोव्हेंबर 2001
- बिग इव्हील नोव्हेंबर 2001 – नोव्हेंबर 2003
- द फीनाम (डेडमॅन हायब्रीड) मार्च 2004 – जून 2008
- द लास्ट आऊटलॉ 2008 – 2013
- द गन स्लीन्गर 2013 – 2017
असे काही पर्सोना मार्क कॅलावेने हाताळले.
काय बोलू? काय लिहू? हा माझा आदर्श नव्हता कधीच पण त्याच्या हॉल ऑफ फेमच्या भाषणाने माझे डोळे उघडले (लिंक देतो) – youtube.com
कसं केलं या माणसाने इतकी वर्ष हे सगळं? का केलं? या सगळ्या गोष्टी त्याने त्याच्या समारोपाच्या भाषणात सांगितल्या. जवळपास सगळ्या रेसलर्स च्या नावानिशी आठवणी सांगितल्या. खरं तर त्याला नॉर्मल आवाजात ऐकणं, त्याने भावनिक होऊन बोलणं, त्याच्या डोळ्यात तरळणार पाणी बघणं हे एकदम अंडरटेकर च्या व्यक्तिमत्वाला विपरीत होतं पण मार्क कॅलावे नामक अवालियाला भेटवणं गरजेचं होतं. मार्कने खूप किस्से सांगितले आहेत.
असाच अजून एक अवलिया आहे. त्यांची आणि याची एक मॅच बघायची इच्छा होती. पण त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. पण जर ती मॅच झाली असती तर ती एंटरटेनमेंट दुनियेतली सर्वात मोठी मॅच ठरली असती.
“द फॉलोइंग कॉन्टेस्ट इझ स्केड्युल्ड फॉर वन फॉल. वी हॅव, फ्रॉम व्हेनीस बीच कॅलिफोर्निया, 6’2” वेइंग 250 पाऊंड्स, द फ्रँचाईझ, द आयकॉन – स्टिंग. (स्टिंग थीम म्युझिक – स्ले मी – पाठीमागे वाजतंय)
इन अनादर कॉर्नर वी हॅव, फ्रॉम डेथ व्हॅली, 6’10” अँड वेइंग 305 पाऊंड्स, द फीनाम, लेजंडरी – अंडरटेकर (अंडरटेकर थीम म्युझिक – ऐन्ट नो ग्रेव – मागे वाजतंय) “
काश ही मॅच झाली असती. तशी शक्यता होती 2011 च्या सुमारास. पण काही कारणाने नाही झालं ते. असो, स्टिंगकडे पुन्हा कधी तरी येऊ. तर हा आहे मार्क आणि हे त्याचं अजून एक रुपडं टेकिंग सोल्स अँड डिगिंग होल्स.
धन्यवाद मार्क, अंडरटेकरला माझ्या भावविश्वात आणल्याबद्दल आणि तुला निवृत्तीच्या शुभेच्छा
लेखक – प्राक्तन पाटील