Home BuyingLoanSidebar Post

तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करताना या मुद्द्यांचा नक्की विचार करा !

आयुष्यात ज्या गोष्टी विचारपूर्वक कराव्या असं वाडवडील सांगून गेले त्यांपैकी एक म्हणजे घर बांधणे किंवा गृहखरेदी. गृहखरेदी करणे म्हणजे एक स्वप्न पुर्ण करणे ही भावना आजही लोकांमध्ये असते. आयुष्यात शक्यतो एकदाच घडणारी ही घटना असते म्हणून योग्य ती निवड करणे किंवा योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. या लेखात आपण गृहखरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात, तपासाव्यात हे पाहणार आहोत.

Your Home Buying Checklist in Marathi

Your Home Buying Checklist in Marathi



मनीष आणि मोक्षदा खूप दिवसांपासून त्यांच्या ड्रीम होमच्या शोधत होते. वर्तमानपत्रात येणाऱ्या आणि जवळपास असणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या लोकेशनाला त्यांनी भेट दिली होती. अनेक वेबसाईट तपासल्या होत्या. इस्टेट एजंटस् च्या गाठी भेटी झाल्या. परंतु त्यांचे ड्रीम होम अजूनही स्वप्नातच होते. त्याची कारणं अनेक होती. त्या दोघांनी मिळून एक चेकलिस्टच बनवली होती जी नवीन घर खरेदी करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाला फायदेशीर ठरेल.

अंधेरीला नोकरी करणाऱ्या मोहनीशने बदलापूरला खूप मोठा, आलिशान फ्लॅट स्वस्तात मिळतो म्हणून घेतला. सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपल्यावर त्याच्या लक्षात आले, शिंगरू तर येरझाऱ्यानेच मरतंय… आजकाल घरातील नवरा आणि बायको दोघेही नोकरी करतात. अशा परिस्थितीत घराचे लोकेशन पाहणे आवश्यक असते. जर घर रेल्वस्थानकापासून, बसस्थानकापासून खूप लांब असेल, दळणवळणाच्या साधनांची फारशी सोय नसेल तर थोडेसे कठीण जाऊ शकते. बऱ्याचदा थोडे दूर असलेले घर स्वस्तात मिळते म्हणून घेतले जाते. कधी मनात असाही विचार येतो, की काही वर्षांनी येथील घराच्या किंमती वाढतील आणि ते विकून चांगला नफा मिळेल. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर योग्य लोकेशन निवडा.

अक्षय्यतृतियेच्या मुहूर्तावर फ्लॅट बुक केल्यावर सोन्याचे नाणे आणि स्कूटर मिळणार म्हणून राधिकाने नवऱ्याला एका उपनगरात फ्लॅट बुक करायला लावला. तो भाग अजून डेव्हलप नव्हता झाला, मार्केट वगैरे सारं काही दूरवर होतं. होईल हळूहळू सुधारणा ही आशा आणि सोन्याचे नाणे या अमिषाला बळी पडलेली राधिका आता पश्चात्ताप करतेय.

बरेच बिल्डर गुढीपाडवा, अक्षय्यतृतिया, दसरा, दिवाळी वगैरे सणांच्या निमित्ताने काही ऑफर्स सादर करतात. किंमतीमध्ये सवलत, गृहोपयोगी वस्तू किंवा वाहने, सोन्याचांदीचे नाणे अशा योजना असतात. या ऑफर्सना बळी पडून घरात, लोकेशन यामध्ये काही गैरसोयी असतील तर दुर्लक्ष केले जाते. पण असे करणे भविष्यात त्रासदायक ठरू शकते. म्हणून अशा ऑफर्सचा लाभ घ्यायचा असला तरी सुरक्षा, दर्जा आणि आपली सोय या मूळ उद्देशाला विसरू नका.

एखाद्या गृहप्रकल्पात घर घेण्याचे नक्की केल्यावर तो प्रकल्प रेरा रजिस्टर्ड आहे याची रेराच्या वेबसाईटला भेट देवून खात्री करून घ्या. वेबसाइटवर प्रकल्पाबद्दल सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या.



माधुरी आणि ऋतुजाने एकाच गृहप्रकल्पात एकत्र घर बुक केले. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की दोघींच्या किमतीमध्ये बराच फरक आहे. कारण बऱ्याचदा ग्राहक किंमतीमध्ये बार्गेनींग करतात हे गृहीत धरून बिल्डर घराची किंमत थोडी वाढवूनच सांगतात. म्हणून किंमत कमी करण्यासाठी जरूर घासाघीस करा.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिल्डरचे ट्रॅक रेकॉर्ड तपासा. त्याने आधी बांधलेल्या इमारतींना भेट देवून, गरज पडल्यास आणि शक्य असल्यास तेथील रहिवाशांकडून बांधकामाचा दर्जा चांगला असल्याची खात्री करून घ्या.

इमारतीला भेगा तर पडल्या नाहीत, घरात गळती आहे का, बांधकामाचे साहित्य, खिडक्या, दरवाजे यांचा दर्जा, प्लंबिंग, सॅनिटेशन, वायरिंग या आधी विचारात न घेतलेल्या आणि कमी महत्त्वाच्या बाबी काळजीपूर्वक तपासा. कारण एकदा घराची खरेदी झाली आणि नंतर काही प्रोब्लेम येत असेल तर दुरुस्तीसाठी खिशाला मोठी चाट बसू शकेल.

बिल्डरकडून घरासंबंधीच्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती मागवून घ्या. त्या स्वतः तपासून आपल्या वकिलांकडूनसुध्दा तपासून घ्या.

महारेरा कायद्यांतर्गत ग्राहकांचे हित तर जोपासले गेले आहे परंतु बिल्डरांच्या अडचणींचाही विचार केला गेला आहे. घर ताब्यात देण्यास ठरलेल्या मुदतीपेक्षा उशीर झाल्यास बिल्डरवर कारवाई होवू शकते त्याचप्रमाणे ग्राहकाने पेमेंट वेळेवर नाही केले तर विलंब शुल्क आकारले जाते. म्हणून पैसे देण्याच्या सर्व अटी आणि नियम माहीत करून घ्या आणि वेळेवर पैसे भरा. तसे आधीच नियोजन करुन ठेवल्यास उत्तम.

बऱ्याचदा बांधकाम चालू असलेले घर खरेदी करणे शक्य नसते. कारण जर आधीच भाड्याच्या घरात राहत असू तर नवीन घराचे बांधकाम पूर्ण होपर्यंत वाट पाहणे आर्थिकृष्टया परवडण्यासारखे नसते. अशावेळी रेडी टू मुव्ह इन म्हणजे लगेच राहण्यास तयार असलेल्या घराचा पर्याय निवडला जातो. अशावेळी इमारतीला पालिकेचा पाणीपुरवठा होत आहे का, नसल्यास काय पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, लिफ्ट चालू आहे का, वीजपुरवठा खंडित झाल्यास लिफ्टसाठी काय सोय आहे, त्या भागात वीजकपात होते का आणि होत असेल तर किती वेळासाठी ही सर्व माहिती मिळवा.

जर बिल्डरने जिम, क्लबहाऊस, स्विमींग पुल, किड्स प्ले एरिया वगैरे सुविधा देवू केल्या असतील तर त्या चालू आहेत का, नसल्यास चालू होण्यास किती काळ लागेल, या सुविधा वापरण्याचे चार्जेस यांची माहिती काढून घ्या.

महानगरांमध्ये भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे पार्किंग. आजकाल घरटी एक चारचाकी आणि एक दुचाकी असतेच. जेव्हा घर पाहायला जाल तेव्हा पार्किंगची काय सोय आहे ते आवर्जून पहा. जर तुम्ही पार्किंग लॉटही विकत घेणार असाल तर तो केवढा मोठा आहे ते पहा. कारण स्टील्ट पार्कींगमध्ये काही लॉटस तुलनेने लहान असतात तर काही मोठे. कॉलम केवढा मोठा आहे यावर ते ठरते. म्हणून तुमच्या फ्लॅटसाठी ठरवलेला पार्कींग लॉट पाहून घ्या.

जर तुम्हाला स्वतंत्र पार्कींग स्पेस विकत घ्यायची नसेल तर कॉमन पार्कींग स्पेस कुठे आहे आणि किती आहे हे पाहणेसुध्दा गरजेचे असते. जर इमारतीच्या आवारात अपुरी जागा असेल तर तुम्हाला तुमचे वाहन बाहेर रस्त्यावर वगैरे उभे करावं लागेल. या गोष्टीचा नक्की विचार करा.

Home quality and safety guide

घराचा दर्जा आणि सुरक्षा :-

Home Quality and Safety

आधी म्हटल्याप्रमणे सामान्य माणूस आयुष्यात एकदाच गृहखरेदी करतो. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी तर लावतोच पण बरेचसे कर्ज वगैरे घेत असतो. त्या घरात आपले कुटुंब, लेकरंबाळ आनंदात, सुरक्षित राहावी इतकी एकच त्याची इच्छा असते. पण हे तेव्हाच होवू शकते जेव्हा घराचा दर्जा उत्तम असतो.

कोणताही बिल्डर शक्यतो घराचा दर्जा आणि गुणवत्ता यामध्ये तडजोड करत नाही कारण शेवटी हा प्रश्न त्याच्या रेप्युटेशनचाही असतो. परंतु याबाबत आंधळा विश्वास न ठेवता शंभर टक्के खात्री करुन घेणेच योग्य असते. तर ते कसे करावे?

सगळ्या नव्या इमारती आतून बाहेरून सुंदर, चकचकीत दिसतात. त्यामुळे बांधकामातील एखादा दोष पटकन लक्षात येत नाही.

घर आतून बघताना रंगाचा दर्जा नक्की पाहा. फक्त भिंतीचाच नाही तर छत, लॉफ्ट, माळे यांना दिलेला रंग सुद्धा चांगल्या प्रतीचा आहे का याची खात्री करून घ्यावी. सहसा उत्तम प्रतीचा आणि हलक्या प्रतीच्या रंगातील फरक डोळ्यांना सहज जाणवतो. हलक्या प्रतीचा रंग फारसा चमकदार नसतो, कुठे कुठे हाताला लागतो, स्पर्शाला गुळगुळीत असा जाणवत नाही. याउलट चांगल्या प्रतीचा रंग सर्वत्र एकसमान, गुळगुळीत, चमकदार दिसतो.

बाथरूम, किचनमधील नळ, शॉवर, बेसिन सिंक या साधनांचा दर्जा तपासा. इलेक्ट्रिक वायरिंग, फिटिंग योग्य आणि योग्य ठिकाणी आहे का, त्यांचे ब्रॅण्ड चांगले आहेत का तेही पहा. कारण खर्चात बचत करण्यासाठी अशा ठिकाणी कमी दर्जाचा माल वापरला जाऊ शकतो.

त्याचबरोबर पुर्ण घरातली अगदी टॉयलेट, बाथरूममधील टाईल्स लेवलही पहा. काहीवेळा टाईल्स वर खाली असू शकतात.

खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद चालू होत आहेत का, खिडक्यांचे फिनिशिंग चांगले आहे का या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

बऱ्याचदा इमारतीला बाहेरून पडलेल्या भेगा, तडे यांच्यावर पॅचवर्क केले जाते. जुन्या इमारतीवर भेगा समजू शकतो पण फारशा जुन्या नसलेल्या इमारतीला तडे गेले असतील तर तिचा पाया मजबूत नसण्याची शक्यता असते. या गोष्टीचा विचार घर घेताना जरुर करा.

गृहखरेदी करताना वरील सर्व मुद्द्यांचा विचार केला तर तुमचे घर नक्की स्वप्नातील घर होऊ शकते याची खात्री बाळगा.

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!