अयोध्या राम मंदिर दर्शन संपूर्ण माहिती: मंदिराचा इतिहास, जाण्याचा मार्ग, रहाण्याची/ खाण्याची सोय, धार्मिक व पर्यटन स्थळे | Ayodhya Ram Mandir Tour Guide
- अयोध्ये बद्दल थोडी माहिती
- राम मंदिर बद्दल थोडी माहिती
- अयोध्येतील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे
- राहण्याची आणि खाण्याची सोय
- अयोध्येतून राम मंदिर पर्यंत कसे जाऊ शकतो?
- महाराष्ट्रातुन अयोध्येला कसे जायचे
नमस्कार मित्रांनो, आज आपण अयोध्या राम जन्मभूमीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण राम मंदिर बाबत माहिती, इतिहास जाणून घेणारच आहोत त्याशिवाय तिथे गेल्यावर रहाण्याची, खाण्याची कशी सोय असते, तसेच महाराष्ट्रातून राम मंदिरला कसे जायचे, त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, श्रीराम हे फक्त एक नाव नाही तर एक राष्ट्रमंत्र आहे. आणि जय श्रीराम हा फक्त आपल्या साठी एक जयघोष नसून आपली प्रेरणा व आपला स्वाभिमान आहे. अश्याच या प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असणाऱ्या व शरयू नदीतीरावर वसलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या ही नगरी फक्त एक ठिकाण नसून एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. पूर्वी अयोध्येला फैजाबाद असे म्हटले जात असे, पण आता त्याचे नाव अयोध्या असे करण्यात आले आहे.
मित्रांनो, अयोध्या फक्त एक धार्मिक स्थळ च नाही तर पर्यटन स्थळ म्हणून ही जगात प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनेक देश विदेशातील नागरिक येथे भेट देण्यासाठी येतात. चला तर मग आपणही या लेखाच्या माध्यमातून अयोध्या या पुण्य नगरीला एक छोटीशी भेट देऊन येऊ, आणि इथे कोण कोणती धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत, त्या बद्दल माहिती जाणून घेऊ. आणि अयोध्येचा मुख्य आकर्षण असलेल्या राम मंदिरा बद्दल ही माहिती जाणून घेऊ या.
अयोध्ये बद्दल थोडी माहिती
मित्रांनो, अयोध्या मध्ये राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेमुळे अयोध्या हे ठिकाण भारतभर एक लोकप्रिय धार्मिक स्थळ बनले आहे. अयोध्या हे हिंदू धर्माच्या सात पवित्र स्थानांपैकी एक आहे, ज्यात मथुरा, काशी, हरिद्वार, उज्जैन, कांचीपुरम आणि द्वारका यांचा समावेश आहे. अयोध्येला घाट आणि मंदिरांचे शहर म्हटले जाते. कारण अयोध्येत तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत हजारो मंदिरे दिसतील. तसेच अयोध्येत वाहणाऱ्या शरयू नदीच्या काठावर अनेक प्रकारचे घाट आहेत. ज्यात गुप्तर घाट, लक्ष्मण घाट, जानकी घाट, राम घाट हे काही प्रसिद्ध घाट आहेत.
अयोध्येतील या विविध घाटांना विशेष पौराणिक महत्त्व आहे. अयोध्येत येणारे भाविक या घाटांवर स्नान करतात कारण असे मानले जाते की घाटात स्नान केल्याने माणसाचे पाप धुतात. मित्रांनो, अयोध्येचे पूर्वीचे नाव फैजाबाद होते. पण 2018 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्या वर त्यांनी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या असे केले.
राम मंदिर बद्दल थोडी माहिती
मित्रांनो, 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री राम मंदिर उभे राहिले. हे मंदिर नागर शैलीतील असून हे राम मंदिर पुढील 800 ते 1000 वर्षांपर्यंत टिकणार आहे. देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले. तसेच या राम मंदिराची रचना ही कोणार्क मंदिरा प्रमाणे असणार आहे, यात कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही.
मित्रांनो, राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान यात वापरले गेले आहे. याशिवाय मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. हे मंदिर 3 मजली असून प्रत्येक मजला हा 20 फुटांचा आहे. या राम मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत.
भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बाल अवस्थेतील मुर्ती स्थित आहे, प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे. तसेच नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप आहेत. खांबावर तसेच भिंती वर विविध देवी देवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे. मंदिरात 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होतो. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची देखील व्यवस्था येथे करण्यात आली आहे. मंदिराच्या चहू बाजूस आयताकृती प्रकार करण्यात आला आहे, त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत.
त्यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती, देवी भगवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. यासोबतच श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषदराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे आहेत. आणि पुढील काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल. सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.
कशी आहे श्री रामाची मूर्ती
मित्रांनो, मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची म्हणजे बाळ स्वरूपातील राम दाखविण्यात आले आहे. यात प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण असून ही मूर्ती पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार आहे. या मूर्तीवर दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम होणार नाही. व त्यामुळे मूर्तीची चमक कधी कमी होणार नाही. या मूर्तीची पायाच्या बोटापासून कपाळा पर्यंत 51 इंच उंची असून मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे.
व यात प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्या पर्यंत लांब आहेत. त्यांचे भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे असणारी ही मूर्ती कमळाच्या फुलावर उभी आहे. मूर्तीच्या एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान असून ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली असून प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची आहे. याशिवाय मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार कोरले गेले आहेत. अश्या या रामलल्लाच्या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आलं आहे.
अयोध्येतील काही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे
- अयोध्येतील घाट:- मित्रांनो, अयोध्येतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यापूर्वी प्रथम शरयू नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की शरयू नदीत स्नान केल्याने माणसाला जीवनातील पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच या नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी अनेक घाट बांधले आहेत, त्यापैकी जानकी घाट, राम की पायडी, लक्ष्मण घाट, राज घाट आणि दशरथ घाट हे प्रमुख घाट आहेत. शरयू नदीत स्नान करून काठावर असलेल्या नागेश्वर नाथ मंदिरात जल अर्पण केल्यानंतर हनुमान गढी येथे जाऊन भगवान हनुमानाचे दर्शन घेतल्या नंतर इतर विधी सुरू होतात.
- हनुमान गढी:- मित्रांनो, डोंगराच्या माथ्यावर हनुमान गढी मंदिर बांधले आहे. व अयोध्या रेल्वे स्टेशन पासून हनुमान गढ़ी फक्त एक किमी अंतरावर आहे. अयोध्येत रामललाचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमान गढी येथे हनुमानजींचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. म्हणून भाविक लोकं रामलला च्या दर्शनाआधी हनुमान गढी वर जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतात. मित्रांनो, या हनुमान गढीवर जाण्यासाठी एकूण 76 पायऱ्या चढून जावे लागते.
या हनुमान मंदिरात भगवान श्रीरामाची 6 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. कलियुगातील राजा म्हणून हनुमान गढी मध्ये भगवान हनुमान विराजमान आहेत. हनुमान गढी मध्ये भाविकां कडून भजन कीर्तनाचे आयोजन ही केले जाते.
- राजा दशरथ महल:- मित्रांनो, अयोध्येतील राजा दशरथ महल हे भगवान रामाचे वडील राजा दशरथ यांचे निवासस्थान आहे. प्रभू श्री रामजींचे बालपण याच राजवाड्यात गेले. राजवाड्याचे सौंदर्य खूप अप्रतिम आहे. राजवाड्याच्या खांबावरील अलंकृत चित्रे अप्रतिम आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. राजवाड्याच्या आत अनेक छोटी मंदिरे आहेत ज्यांना भेट देता येते.
- राजा दशरथ समाधी स्थळ:- मित्रांनो, राजा दशरथाच्या मृत्यू नंतर त्यांचे धाकटे मुलगे भरत आणि शत्रुघ्न यांनी अयोध्या शहरात त्यांचे अंतिम संस्कार केले. त्यावेळी भगवान राम, लक्ष्मण आणि माता सीता 14 वर्षे वनवासात होते. समाधी व्यतिरिक्त, मंदिरात तुम्हाला दशरथजींच्या मूर्तीसह भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती एकत्र पाहायला मिळतील.
मंदिराच्या आत दशरथाचे गुरू वशिष्ठ यांची देखील मूर्ती दिसते. मित्रांनो, राजा दशरथ समाधी स्थळाला भेट देण्यासाठी शनिवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. मंदिराच्या आवारात वट वृक्षाखाली शनिदेवाचे मंदिरही आहे. ल राजा दशरथ समाधी स्थळ अयोध्ये पासून 13 किलो मीटर अंतरावर पुरा बाजारच्या बिल्लाहरी गावात आहे. तुम्हाला समाधीच्या ठिकाणी जाण्यासाठी बस, ऑटो रिक्षा किंवा कॅब बुक करता येते.
- कैकेयी महल किंवा कनक महल:- मित्रांनो, हनुमान गढी वरून चालत तुम्ही कनक महालात पोहोचू शकता. नावाप्रमाणेच कनक म्हणजे सोने, म्हणून कनक महालाला गोल्डन पॅलेस असेही म्हणतात. 12 व्या शतकात बुंदेलखंड स्थापत्य शैलीत बांधलेला हा राजवाडा आधी कनक भवन होता पण नंतर त्याचे मंदिरात रूपांतर करण्यात आले. कनक महालात प्रभू राम आणि त्यांची पत्नी माता सीता सोन्याचा मुकुट परिधान केलेल्या मूर्तीच्या रूपात उपस्थित आहेत.
सोन्याच्या मुकुटामुळे या मंदिराला सुवर्ण मंदिर असेही म्हणतात. कनक भवन हे अयोध्येतील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. पौराणिक कथां नुसार, असे म्हटले जाते की कनक भवन माता कैकेयीने सीताजींना भेट म्हणून दिले होते. वनवासात जाण्यापूर्वी भगवान राम माता सीते सोबत या इमारतीत राहत होते. कनक मंदिराच्या एका भागात गाणी आणि संगीताचे अप्रतिम प्रदर्शन केले जाते.
- सीता रसोई मंदिर:- मित्रांनो, सीता रसोई मंदिर हे अयोध्या शहरातील एक प्राचीन स्वयंपाक घर आहे. हे प्राचीन काळातील स्वयंपाक घरातील मॉडेल प्रदर्शित करते. माता सीतेला अन्नपूर्णा म्हणजेच अन्नाची देवी म्हणतात, याच आधारावर सीता रसोई मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीं सोबतच त्यांचा भाऊ आणि हनुमानजींच्या मूर्तीही स्थापित केल्या आहेत. सीता रसोई ही मंदिराप्रमाणे बांधण्यात आली आहे, दुसऱ्या भागात लड्डू गोपाल, नंदी महाराज आणि माता दुर्गा पाहायला मिळतात. सीता किचन मध्ये जाऊन तुम्ही प्राचीन काळातील स्वयंपाकघर पाहू शकता. ही सीता रसोई छोटी छावनीच्या जानकी घाटावर स्थित आहे.
- मणि पर्वत:- मित्रांनो, तुम्हाला रामायणात मणिपर्वताचे वर्णन केलेलं दिसेल. लंकेत रावणाशी झालेल्या युद्धात लक्ष्मण बेशुद्ध झाले होते तेव्हा लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानजी संजीवनी वनस्पतीच्या शोधात अयोध्येत आले होते. पण डोंगरात औषधी वनस्पती शोधत होते. जेव्हा त्याला औषधी सापडली नाही तेव्हा त्याने संपूर्ण पर्वत आपल्या हातांनी उचलला होता. अयोध्या शहराला भेट देणारा प्रत्येकजण मणिपर्वत पाहण्यासाठी नक्कीच जातो.
मणि पर्वतावर जाण्यासाठी 108 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या शिखरावर मणि भगवानाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य तुम्हाला मिळेल. पौराणिक कथेनुसार, सीताजींच्या लग्नानंतर त्यांचे वडील जनकजी यांनी असंख्य रत्ने भेट म्हणून दिली होती, त्यामुळे रत्नांचा ढीग तयार होऊन पर्वतासारखा आकार आला आणि त्यामुळे ते मणिपर्वत म्हणून ओळखले जाऊ लागले. मणीपर्वत हे अयोध्ये पासून आठ किमी अंतरावर स्थित आहे. तेथे तुम्ही ऑटो रिक्षा किंवा बस द्वारे जाऊ शकता.
- मोती महल:- मित्रांनो, मोती महल हा 1743 मध्ये बांधला गेला. शुजा- उद- दौलाची पत्नी राणी बेगम उन्मतू जोहरा या राजवाड्यात राहत होत्या. या मोती महलला पर्ल पॅलेस असेही म्हणतात. काळानुसार हा राज वाडा आता भग्नावस्थेत बदलला आहे. परंतु राजवाड्याचा फक्त काही भाग पाहण्यासारखा आहे. मित्रांनो, या मोती महालात मुघल वास्तुकलेची झलक पाहायला मिळते. मोती महालाच्या भिंतींवर अप्रतिम कारागिरी पाहायला मिळते. राज वाड्याच्या भिंतींवर सुंदर रचना करण्यात आल्या आहेत ज्या अतिशय भव्य दिसतात.
- नागेश्वर नाथ मंदिर:- मित्रांनो, राम जी की पैडी वर वसलेले नागेश्वर नाथ मंदिर हे भगवान शंकराला समर्पित प्राचीन मंदिर आहे. भगवान शिव अयोध्येच्या कानाकोपऱ्यात विराजमान आहेत. पौराणिक कथेनुसार हे मंदिर भगवान रामाचा मोठा मुलगा कुश याने बांधले होते. या मंदिरावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. कारण मंदिरात मागितलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. या मंदिरातच नंदीची मूर्ती देखील आहे. नंतर मंदिराची पुनर्बांधणी राजा विक्रमादित्यने केली असे इतिहासकारांचे मत आहे.
- अयोध्या, नंदीग्राम:- मित्रांनो, नंदीग्राम हे असे ठिकाण आहे जिथे प्रभू श्री रामचा धाकटा भाऊ भरत याने प्रभू राम 14 वर्षांच्या वनवासात असताना श्री रामाचे चरण पादुका त्या सिंहासना वर ठेवून ते सिंहासन उजळवले होते. या नंदीग्राम मध्ये चार प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यात भरत कुंड, श्री भरत हनुमान मिलाप मंदिर, श्री राम भरत मिलाप मंदिर आणि श्री भरत जी मंदिर.
- गुप्तर घाट:- मित्रांनो, गुप्तर घाट हा अयोध्येचा अत्यंत पवित्र घाट आहे. या गुप्तर घाटावरच प्रभू श्री रामजींनी शरद पौर्णिमेच्या दिवशी आपले जीवन संपवले आणि वैकुंठ धामला प्रस्थान केले. हा गुप्तर घाट नेहमीच भाविकांनी फुललेला असतो. गुप्तर घाटावर बोट राइडची देखील सोय आहे. गुप्तर घाटात स्नान करून तुम्ही अयोध्या प्रवासाची सांगता करू शकता.
अयोध्येत गेल्यावर राम मंदिर पर्यंत कसे जाऊ शकतो?
मित्रांनो, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन वर पोहोचल्या नंतर राम मंदिर फक्त एक किलोमीटर आहे. त्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही ई-रिक्षा, टेम्पो किंवा ऑटो रिक्षाने जाऊ शकता. राम मंदिरापर्यंत जाण्याचा मुख्य मार्ग स्टेशन जवळील रामपथ येथून असून त्यासाठी तुम्हाला 10 ते 20 रुपये भाडे देऊन आणि तुम्ही सहज मंदिर पर्यंत पोहोचू शकता. राम मंदिरात जाणाऱ्या भाविकांना रामपथ वर इलेक्ट्रिक बसही मिळेल जी मंदिरासमोरूनच जाईल. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. याशिवाय राम मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता लवकरच ऑनलाईन स्वरूपात दर्शन पास काढणे व आरती साठी बुकिंग सुरू होणार आहे, त्यासाठी राम मंदिर देवस्थान समिती द्वारे लवकरच संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.
अयोध्येला कधी भेट द्यावी?
मित्रांनो, अयोध्या हे एक धार्मिक स्थळ असल्याने वर्षभर लोक येथे दर्शनासाठी येत असतात. पण जर तुम्हाला अयोध्येला भेट द्यायची असेल तर सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत चे हवामान चांगले असते. सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत देश -विदेशातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. एप्रिल ते जून या काळात खूप गरम होते.
त्यामुळे लोकांची वर्दळ कमी राहते. मात्र, पावसाळ्यातही तुम्ही अयोध्येला भेट देऊ शकता. तर दसरा आणि दिवाळीच्या काळात अयोध्या नगरीला नव वधू प्रमाणे सजवले जाते. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, रामायणातील पात्रे पथनाट्यातून मांडली जातात. दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान तुम्ही अयोध्येला भेटायला गेलात तर तुम्हाला खूप आनंद मिळेल.
अयोध्येत राहण्याची व खाण्याची सुविधा
मित्रांनो, अयोध्या हे उत्तर प्रदेशातील एक धार्मिक शहर आहे. जर तुम्ही अयोध्येत गेलात तर तुम्हाला राहण्यासाठी राम मंदिराच्या आजूबाजूला अनेक हॉटेल्स दिसतील तेथे तुम्ही राहू शकता. इथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे 700 ते 1500 रुपयांपर्यंत आहे. पण जर तुम्हाला कमी बजेट मध्ये राहायचे असेल तर तुम्ही धर्मशाळेत देखील राहू शकता. अयोध्या जंक्शन वरून खाली उतरताच, जवळपास अनेक पर्याय उपलब्ध आहेत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये हॉटेल्स बुक करू शकता. तसेच अयोध्या हे धार्मिक स्थळ असल्याने येथे खाण्यासाठी शक्यतो शाकाहारी भोजनच उपलब्ध असते.
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी जेवणाची थाळी 150 ते 250 रुपयांना मिळते. त्यात तांदूळ, चपाती, दाळ, भाज्या आणि मिठाई, लोणची, रायता यांचा समावेश आहे. पण जर तुम्हाला संध्याकाळी काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्हाला चाट आणि पाणीपुरीचे स्टॉल देखील दिसतील जिथे तुम्हाला स्ट्रीट फूड खाता येईतो. इथे गोड पदार्थांमध्ये दही जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. तसेच जवळपासच्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला उत्तर भारतीय तसेच इडली, डोसा, उत्तपम, सांबर, यांसारखे दक्षिण भारतीय पदार्थ देखील मिळतील.
याशिवाय अयोध्येत भाविकांना मोफत भोजनही दिले जाते. प्रभू रामाचे दर्शन घेतल्यानंतर राम मंदिरात प्रसाद म्हणून भोजन घेता येते. येथील जेवण अतिशय दर्जेदार आहे. तथापि मोफत भोजन मिळवण्यासाठी राम रसोई मध्ये आपले नाव नोंदवणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्रातुन अयोध्येला कसे जायचे?
मित्रांनो,अयोध्या किंवा फैजाबादला जाण्यासाठी तिन्ही प्रकारे म्हणजे रेल्वे, फ्लाइट व महामार्ग द्वारे तुम्ही जाऊ शकता.
नाशिकहून अयोध्येला कसे जायचे?
मित्रांनो, तुम्ही जर नाशिक ते अयोध्या रेल्वे ने प्रवास करणार असाल तर तुम्ही saket एक्सप्रेस ने जाऊ शकता. या रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी 22 ते 23 तास लागू शकतात. व त्यासाठी तुम्हाला 600 ते 700 रू रेल्वे भाडे लागू शकते. तसेच जर तुम्ही फ्लाइट ने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मुंबई विमानतळावरून लखनऊ विमानतळापर्यंत सर्वात जलद विमान उड्डाण आहे ज्याला 1 तास 55 मिनिटे लागतात. तसेच नाशिक ते अयोध्या तुम्ही ड्राइव्ह ही करू शकता. नाशिक ते अयोध्या अंतर हे अंदाजे 1290 किमी आहे. त्यामुळे नाशिक ते अयोध्या गाडी चालवायला अंदाजे 18 तास 30 मिनिटे लागतात.
पुण्याहून अयोध्येला कसे जायचे?
मित्रांनो, पुण्याहून अयोध्येपर्यंत डायरेक्ट रेल्वे उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला अयोध्येच्या जवळपासच्या मुख्य रेल्वे स्थानकांवर उतरावे लागेल. त्यासाठी तुम्ही पुणे जंक्शन ते मनकापूर जंक्शन, पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन ने जाऊ शकता. तसेच जर तुम्ही फ्लाइट ने जाणार असाल तर तुम्हाला जवळपास दोन तास लागू शकतात व त्यासाठी अंदाजे सहा ते सात हजार रुपये भाडे लागू शकते. तसेच पुणे ते अयोध्याचे रस्त्याने अंतर 1568 किमी इतके आहे. त्यासाठी 27 ते 28 तास लागू शकतात. तुम्ही कार, टॅक्सी किंवा खाजगी बसने देखील जाऊ शकता. खाजगी बस साठी तुम्हाला तीन ते चार हजार रुपये भाडे लागू शकते.
मुंबई हून अयोध्येला कसे जायचे?
मित्रांनो, तुम्ही जर मुंबई ते अयोध्या रेल्वे ने प्रवास करणार असाल तर तुम्ही तुलसी एक्सप्रेस ने जाऊ शकता. या रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी अंदाजे 30 तास लागू शकतात. व त्यासाठी तुम्हाला 700 ते 800 रू रेल्वे भाडे लागू शकते. तसेच जर तुम्ही फ्लाइट ने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अयोध्येत पोहचायला कमीत कमी 2 तास लागतील व त्यासाठी चार ते पाच हजार रू विमान भाडे लागू शकते. याशिवाय तुम्ही बस ने देखील जाऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. तसेच ट्रॅव्हल ने स्लीपर कोच ने गेल्यास 4000 रू पर्यंत भाडे लागू शकते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या या ठिकाण बद्दल माहिती बघितली तसेच अयोध्या मध्ये फिरण्याची इतर कोणती ठिकाणं आहेत या बडफल ही माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
Tags: Ram Mandir Kase Jayche, Ram Mandir Trip Mahiti, Ram Mandir Darshan Mahiti, Ram Mandir Darshan Plan Mahiti, Ram Mandir Railway Mahiti, Ram Mandir Railway info in Marathi, Ram Mandir Tour Guide in Marathi, Ayodhya Mandir Trip Mahiti, Pune to Ram Mandir, Mumbai to Ram Mandir, Nashik to Ram Mandir, Ayodhya La Kase Jayche