आगळं वेगळं

अस्सल गोवन पेयाची कूळ कथा – उराक

बाटलीबंद फेणी जी तुम्ही गोव्यात कोणत्याही दुकानात घेऊ शकता तसं उराकचं नाहीये. उराक प्यायला मिळण्यासाठी तुम्हाला अस्सल गोवन मित्र हवेत. असे कुटुंब ओळखीचे हवे ज्यांच्या काजूच्या बागा आहेत. कारण उराक फक्त तेच तयार करून स्वतः पिण्यासाठी वापरतात.

Urak Cocktail information Marathi

एक असं पेय जे बहुतेक पर्यटकांना माहिती नसते कारण त्याची चुलत बहीण, फेणी जास्त लोकप्रिय/ बदनाम आहे. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यांत उराक तयार केली जाते. गोवावासीय उन्हाळ्याच्या महिन्यांत उराक पितात आणि जूनच्या पहिल्या पावसानंतर पिणे थांबवतात.



याचं शेल्फ लाइफ अत्यंत कमी आहे. यंदा बनवलेली उराक पुढच्या वर्षी उन्हाळा येईपर्यंत परत दिसणार नाहीस. तथापि, त्याचे काही चाहते काचेच्या बाटल्यांमध्ये उराक ठेवून आणि फ्रिजमध्ये साठवण करतात. तीच चव आणि उत्कट आनंद मिळतो. स्थानिक आख्यायिका अशी आहे की उन्हाळ्याच्या महिन्यांत उराक प्यायल्याने वर्षभर सर्दी आणि ताप दूर राहतो.

उराक ही पिकलेल्या काजूच्या फळापासून तयार केली जाते. हे काजू फळाचे पहिले डिस्टिलेशन आहे. दुसऱ्या डिस्टिलेशन नंतर फेणी तयार होते. फेणीप्रमाणे उराक उग्र दणका देत नाही. यातून काजू फळाचा, सौम्य तिखटसर सुगंध येतो. हे दिसायला दुधाळ आणि चवीला रसदार लागतं. ज्यांना फॅक्टरीमेड पारदर्शक पेयाची अपेक्षा आहे, हे त्यांच्यासाठी नक्कीच नाही.

विचार करा, ‘तुम्ही एखादी मस्त लक्झरी कार घाटातून चालवताय, बाजूला मोहक समुद्राच्या लाटा दिसतायत आणि चेहऱ्यावर येणारी मंद वाऱ्याची झुळूक तुमच्या केसातून जातेय’ – अस्सा फील उराक देते. काही ड्रिंक्स असे लगेच सातव्या आसमानात वगैरे पोचवतात, तसं इथे होत नाही. एकदम क्लासी फील असतो (स्वानुभव आहे)

समुद्रकाठी बसून उराक पिण्याचा सल्ला कोणताच अस्सल गोवन तुम्हाला देणार नाही. असं म्हणतात की समुद्री वारे आणि उराकची नशा हे एकत्रितपणे वेगळंच रसायन निर्माण करते. मी काही खरं खोटं केलं नाही – गोवेकरी खोटं सांगून काय साध्य करणार? त्यांच्या पेयाबाबत त्यांचा सल्ला सर-आँखो पर…

उराक कशी पितात?



उराक प्यायचा काही खास विधी नाही. नॉर्मली अर्धी उराक आणि अर्ध पाणी असं पिता येतं. किंवा अर्धी उराक आणि अर्ध लिमका (बाकी सॉफ्ट ड्रिंक्सने उराकचा फ्लेवर जातो) असं चालतं. बऱ्याचदा हायबॉल ग्लासात अर्धा ग्लास भरून बर्फ आणि वरून अर्धी उराक. त्यात वाटल्यात पुदिन्याची पाने चुरून टाकता येतील. हवं असल्यास एखादी लिंबाची चकती पिळता येईल. शेवटी उभी पण अर्धवट कापलेली हिरवी मिरची सोडणे मस्त आहे (याने वेगळाच तडका येतो, हे मी ज्याच्या घरी पहिल्यांदा उराक प्यायलेलो तेव्हा त्याने सांगितलं होतं).

लेखक – प्राक्तन पाटील

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!