क्रिकेट, ड्रीम 11 (Dream 11) आणि शेअर मार्केट
खरं म्हणजे ड्रीम इलेव्हन आणि शेअर मार्केट यांचा दूरवर काहींच संबंध नाही. ड्रीम इलेव्हन क्रिकेट खेळाच्या आधारावर उभारलेली एक फँटसी लीग आहे. तर शेअर बाजार म्हणजे जिथे सर्वसामान्य लोकं छोट्यात छोट्या ते भल्या मोठाल्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवू शकतात. मग या दोघांचा एकत्रित संबंध येतो कुठे? तर जरी या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही गोष्टींचा एकत्रित संबंध येत नाही. तरी देखील एक गोष्ट दोन्हीमध्ये समान आहे. ती म्हणजे ‘पैश्यांची गुंतवणूक’. या गुंतवणूकीमध्ये नेमकी काय समानता आहे हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

हा आर्टिकल लिहण्यामागे हेतू हा आहे की लोकांना शेअर मार्केट अगदी सोप्प्या भाषेत समजावून सांगणे. ज्या लोकांना शेअर मार्केट हे जुगार असल्यासारखे वाटते त्यांना ड्रीम इलेव्हनच्या भाषेतून शेअर बाजार समजावून सांगणे हा हेतू आहे.
तर बऱ्याच जणांना शेअर बाजार हा नेमका काय प्रकार असतो तेच माहीत नसते. फक्त तिथे पैसे गुंतवतात एवढंच काही ते माहीत असतं. आणि हा एक प्रकारचा जुगार आहे असं समजून बरींच लोकं शेअर मार्केटकडे पाठ फिरवतात. अशी शेअर मार्केटकडे पाठ फिरवणारी आणि क्रिकेट आवडीने पाहणारी लोकं. हा लेख आवर्जून त्यांच्यासाठी
तर ड्रीम इलेव्हन हा काय प्रकार असतो तो आधी आपण थोडक्यात पाहू. तर समजा एका क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन केलं आहे. आता या खेळात एकूण २२ खेळाडू खेळणार. दोन्ही संघाच्या १५/१५ जणांच्या म्हणजेच एकूण ३० जणांच्या चमू मधून हे २२ खेळाडू निवडले जाणार. मग ड्रीम इलेव्हन वर तुम्हाला हे दोन्ही संघातले सगळे खेळाडू दिसतात. या २२ खेळाडू पैकी आपल्याला निवडायचे आहेत आपले एकूण ११ खेळाडू.
आता आपण समजू की हे २२ खेळाडू आपले शेअर बाजारातील एक एक स्टॉक आहेत. आणि या २२ स्टॉक मधून आपल्याला विचारपूर्वक ११ स्टॉक निवडायचे आहेत.
आता शेअर बाजारातून शेअर खरेदी करताना आपल्याला आपलं बजेट पाहावं लागतं आणि त्यातून आपल्याला आपल्या आवडीचे स्टॉक बजेट मध्ये असतील तरच खरेदी करता येतात. तसंच ड्रीम इलेव्हन आपल्याला देते फक्त १०० रुपयात ११ खेळाडू खरेदी करण्याची संधी. आणि खेळाडूंच्या किंमती साधारण पणे ७ ते १२ रुपयांच्या दरम्यान असतात. म्हणजे एखादा खेळाडू खुप छान कामगिरी करत असेल तर तर त्याला अधिक किंमत मोजावी लागते आणि एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर तो अगदी कमी किंमतीत उपलब्ध होतो. शिवाय जे सुपेरस्टार खेळाडू असतात ते आपल्या टीममध्ये घेण्यासाठी आपल्याला जरा जास्तच पैसे द्यावे लागतात. शेअर बाजार पण असेच आहे ना? मोठ्या नावाजलेल्या कंपनीचे शेअर्स घायचे तर जास्त किंमत आणि पेंनी स्टॉक अगदी कवडीमोल भावात मिळतात
मग येतं सेक्टर, शेअर बाजारात जसे सेक्टर प्रमाणे कंपन्या असतात. आयटी सेक्टर, बँकिंग सेक्टर, एफएमजीसी सेक्टर, वेहीकल सेक्टर. तसे ड्रीम इलेव्हन मध्ये असे चार सेक्टर असतात असे आपण समजू शकतो.
- फलंदाज
- गोलंदाज
- अष्टपैलू खेळाडू
- यष्टीरक्षक
यामध्ये ड्रीम इलेव्हन ने काही नियम आखून दिले आहेत. जसे की
- एका संघातले किमान ५ खेळाडू तर घ्यावेच लागतील.
- दोन्ही संघातून, राखीव धरून फक्त एकच यष्टीरक्षक निवडू शकतो.
- एक अष्टपैलू खेळाडू निवडणे बंधनकारक आहे
- या नियमांमुळे संघ संतुलित राहतो.
वर आपण ड्रीम इलेव्हन संघ निवड आणि शेअर बाजार मधील स्टॉक निवड यातील साम्य पाहिले. आता आपण बघू की या दोन्ही मध्ये ‘जुगार’ विरुद्ध ‘विचारपूर्वक खेळ’ हे दोन पैलू कसे असतात
आपण शेअर बाजार हा जुगार आहे हे नेहमी ऐकतो याला कारण म्हणजे विचार न करता शेअर्सची केलेली निवड. म्हणजे बघा ना, जर विचार न करता अगदी हाताला सापडेल ते, अगदी स्वस्तात मिळत आहे म्हणून आपण काहीही घेत सुटलो तर हाती फक्त कचराचं लागतो. मग ते शेअर मार्केट मध्ये स्वस्तात मिळालेले पेंनी स्टॉक असुद्या नाहीतर मग ड्रीम इलेव्हन मध्ये स्वस्तात मिळालेले खेळाडू असुद्यात.
मग स्वस्तातले स्टॉक आणि स्वस्तातले खेळाडू घ्यायचेचं नाहीत का?
हीच तर खरी गंमत आहे आणि इथेच खरा अभ्यास आणि आपल्या निवडीची कसोटी लागते, म्हणजे अभ्यास करून ही रिस्क टाळली जाऊ शकत नाही पण बऱ्याच प्रमाणात कमी केली जाऊ शकते?
आता ड्रीम इलेव्हन मध्ये हा अभ्यास कसा करायचा?
तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सामना खेळवला जाणारे मैदान. आणि त्यावरील खेळपट्टी!
पहिल्यांदा आपण मैदानाचा विचार करू. समजा मुंबई इंडियन्सची मॅच आहे, आणि ती मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम वर आहे. आता आपण अगदी सहज विचार करू शकतो की मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू रोहित शर्मा या मैदानावर चांगला खेळण्याची शक्यता जास्त आहे. कारण हे त्याचे होम ग्राऊंड आहे. इथे त्याने बरीच वर्षे क्रिकेट खेळेलेले आहे. मैदानावर चेंडू कसा उसळतो, किती खाली राहतो याचा त्याला इतरांपेक्षा जास्त अंदाज आहे. तर मग मी रोहित शर्माला पहिला माझ्या ड्रीम इलेव्हन टीम मध्ये घेईन आणि कॅप्टन करेन. किंवा एकंदरीतच त्या २२ खेळाडूंनी त्या मैदानावर या आधी कसा खेळ केला आहे हे पाहीन. अश्या पध्दतीचा मैदानाचा आणि खेळाडूंचा एकत्रित अभ्यास आपल्याला करता येईल. ज्यामुळे मला माझी टीम निवडणं सोप्प जाईल.
शेअर बाजारात पण सेक्टर प्रमाणे असा अभ्यास आपल्याला करता येईल का ते पाहता येईल. म्हणजे पावसाळा आला की चहा आणि कॉफी पिण्याची लोकांची वारंवारता वाढते आणि या कंपन्यांची शेअर्सची किंमत पण तुलनेने वाढते. असा आपण एक अंदाज बांधू शकतो आणि त्या दृष्टीने अभ्यास करू शकतो.
आता ड्रीम इलेव्हन टीम बनवताना खेळपट्टीचा कसा विचार करता येऊ शकतो? तर याबाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहता येतील
- खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे की गोलंदाजांना अनुकूल आहे?
- पहिल्या डावात सरासरी धावसंख्या किती बनते आणि दुसऱ्या डावात सरासरी धावसंख्या किती बनते?
या दोन गोष्टी लक्षात आल्या की टीम बनवायला मदत होते. मग जर खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल तर मी स्वस्तात मिळणारे चांगले फलंदाज माझ्या संघात घेईन, फलंदाजीमध्ये जो फलंदाज चांगला फॉर्म मध्ये असेल त्याला कॅप्टन करेन. अशी एक संघाची ढोबळ संकल्पना करता येईल. शेअर्सचा पण आपल्याला असा विचार करता येईल. म्हणजे एखादी कंपनी दर वर्षी डिव्हिडंड जाहीर करते, ती ज्या महिन्यात हा डिव्हिडंड जाहीर करते त्या महिन्यात त्या शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते. मग याचं गोष्टींचा आपल्याला दोन वेगळ्या पद्धतीने फायदा करून घेता येऊ शकतो. म्हणजे ती कंपनी डिव्हिडंड जाहीर करते त्या महिन्याच्या आधीपासूनच मी ते शेअर्स माझ्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करायला सुरुवात करेन. आणि साहजिकच माझ्याकडे ते शेअर्स असल्याने मला चांगलं डिव्हिडंड मिळेल किंवा डिव्हिडंडची तारीख ओलांडून जाण्याआधी मी हे शेअर्स लगेच विकून प्रॉफिट बुक करेन.
वर सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दर वेळी सांगितलेल्या पद्धतीने होतीलचं असे नाही. पण जास्तीत जास्त वेळा यातलं बरंचस शक्य होईल याची वारंवारता जास्त असेल यात शंका नाही.
तर मग मित्रांनो, कसा वाटला हा आर्टिकल? हा आर्टिकल वाचून शेअर बाजार कळायला तुम्हाला मदत होईल अशी मी आशा करतो.
लेखक – अभिजित ननावरे