Home BuyingLoanSidebar Post

भाड्याचे घर की स्वतःचे घर? हे वाचाच… | Renting vs Buying a Home

मूळ मुद्द्याला सुरवात करण्याआधी एक गोष्ट, तुम्हाला माहित आहे, तरी देखील परत सांगण्याचा मोह होत आहे,

तर एक होता राजा, त्याला होत्या दोन राण्या. त्यातली एक होती आवडीची आणि दुसरी होती नावडती. दोघींना एक एक मुलगा होता. एकदा नावडत्या राणीचा मुलगा राजाच्या मांडीवर बसला होता. तिथे आवडती राणी आली आणि तिला ते पहावले नाही म्हणून तिने त्या मुलाला राजाच्या मांडीवरुन खाली खेचले. त्या मुलाला राग आला आणि तो वनात तपश्चर्या करायला निघून गेला. त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्याला देव प्रसन्न झाले आणि त्याला वर मागायला सांगितला. मग तो मुलगा देवाला म्हणाला “देवा! मला अशी जागा दे जिथून मला कोणीही हाकलून देऊ शकनार नाही” देव तथास्तु म्हणाला. आणि त्या मुलाला ध्रुव ताऱ्याचे अढळ स्थान मिळाले.



Renting vs Buying a Home

ही लहानपणी ऐकलेली गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपली आपल्या हक्काच्या घराबाबतीत काहीशी अशीच कल्पना असते. अशी जागा, जिथून आपल्याला कुणीच बाहेर काढू शकणार नाही. पण खरंच हे सत्य आहे का? मला तरी यात फारसं तथ्य वाटत नाही, कारण आपण घर विकत घेतो तेव्हा एवढी मोठी रक्कम आपल्याकडे शक्यतो नसते त्यामुळे ते घर गृहकर्ज घेऊनच विकत घ्यावे लागते. आता हे गृहकर्ज किमान १५ ते २० वर्षे किंवा जास्तीत जास्त ३० वर्षासाठी असते. या काळात आपल्या घराची कागदपत्रे ही बँकेच्या ताब्यात असतात.

म्हणजे अप्रत्यक्षपणे गृहकर्ज दिलेली संस्था/बँक ही आपल्या घराची मालक असते आणि आपण एवढी वर्षे आपल्याच घरात भाडेकरू म्हणून राहत असतो. बरं इतर घर मालकांसारखे हे घर मालक नसतात. इतर काही घर मालकांना तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करू शकता, ‘अहो! पगारच नाही झाला या महिन्यात, वगैरे वगैरे… पण इकडे तुम्ही तुमच घर भाडं (इथे हफ्ता म्हणू) थकवलं की हे घरमालक तुम्हाला नोटीस पाठवणार, आणि काही ठराविक कालावधी नंतर ते तुम्हाला घरातून बाहेर काढू शकतात, असा कायदेशीर अधिकार त्यांना असतो, मग काय तुमच्याच घराचा लिलाव करून, आपले पैसे काढून घेईल तो मालक. आणि तुमच्या हातात काहीच राहणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचं घरभाडे (घराचा हफ्ता) व्यवस्थित देत आहात तो पर्यंतचं तुम्ही घराचे मालक आहात.

आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही आमचे हफ्ते वेळेवर भरू, कदाचित लवकर भरून आमचं घर कर्जमुक्त करू, मग तर आमचं हे घर हक्काचं झालं ना? मग तर आम्हाला या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही ना? जर तुम्ही असा विचार करत असाल तर मी म्हणेन की तुम्ही अजूनही चुकीचा विचार करत आहात. तुमचं घर कर्जमुक्त झालं असलं तरी तुम्हाला घरासाठी कायमस्वरूपी काही खर्च असतातच. जे घरासोबत देखभाल खर्च आणि मालमत्ता कर या नावाने कायमचे आपल्यासोबत जोडले जातात. म्हणजे आपण आपल्या गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च बराच काळ दिला नाही तर त्या गृहनिर्माण संस्थेला आपले घर जप्त करण्याचा अधिकार असतो आणि तीच गोष्ट मालमत्ता करा विषयी. जर मालमत्ता कर बराच काळ थकला असेल तर सरकारला आपले घर जप्त करण्याचा अधिकार आहे. भले ही रक्कम इएमआई एवढी मोठी नसेल, पण ती भरणे आपल्याला बंधनकारक आहेच ना? मग जर हे बंधनकारक असेल तर मग आपली ध्रुव ताऱ्याची जागा कुठे राहिली?

आपल्या हक्काचं घर हा आपल्यासाठी फार भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या हक्काचं घर नकोच असं माझं म्हणणं नाही, परंतु आपण आपल्या तारुण्यात नोकरीला लागल्यावर लगेच घर घ्यायची घाई करतो. पण जर नोकरीच्या सुरवातीच्या काळात भाड्याने राहून, जो खर्च इएमआई पेक्षा बराच कमी असतो, आणि उरलेले पैसे दीर्घकाळ साठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर जेव्हा तुमची निवृत्ती जवळ येईल तेव्हा तुम्ही शहरापासून दूर, कमी किंमतीत एखादे छान से घर घेऊ शकता. याचे दोन फायदे होतील. नोकरीच्या काळात तुम्ही नोकरीच्या ठिकाणापासून जवळच्या अंतरावर घर भाड्याने घेऊ शकता. त्यामुळे नोकरी दरम्यान प्रवासाचा अतिरिक्त त्रास वाचेल. आणि उतार वयात आपल्याला शहरापासून दूर निसर्गाच्या राहायची इच्छा असते, ती देखील पूर्ण होईल.

आपण गृहकर्ज घेऊन विकत घेतलेल्या घराच्या किमतीच्या जवळपास दुप्पट रक्कम आपल्याला बँका/गृहकर्ज देणाऱ्या संस्थेला कर्ज+कर्जाचे व्याज यापोटी परत करावी लागते. ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मग हा व्याजापोटी जाणार पैसा आपण गुंतवणूक करून वाढवला तर शहरापासून थोडं लांब घर घेण्यासाठी लागणारी रक्कम आपल्याला लवकर जमवता येऊ शकते.



अश्या पध्दतीने घराचे नियोजन करता येऊ शकते. हे फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी (ध्रुव ताऱ्याचे अढळ स्थान). बाकी आपले घर हे ध्रुव ताऱ्याच्या जागे सारखे नसते हे वरील मुद्यांवरुन स्पष्ट झालेच असेल.

आशा आहे की या लेखामुळे घर कधी विकत घ्यायचे आणि किती दिवस भाड्याने राहायचे याचे नियोजन करायला आपल्याला मदत होईल.

हे हि वाचा – तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करताना या मुद्द्यांचा नक्की विचार करा !

लेखक – अभिजित ननावरे

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट वर तुम्हाला विविध क्षेत्रातील (सरकारी योजना, आरोग्य, गव्हर्नमेंट लायसन्स, लोन माहिती...) नवनवीन माहिती सहज सोप्या भाषेमध्ये तुमच्या व्हाट्सएप्प वर मिळेल, आत्ताच आमचा व्हाट्सएप्प चॅनेल फ्री मध्ये जॉईन करा. धन्यवाद



error: हा लेख कॉपी होऊ शकत नाही !!